बुंदी रायता ही जेवणातील साइड डिश म्हणून ओळखली जाते. आतून गारवा देणारा, पोटाला शांत करणारा बुंदी रायता जेवणात असला की जेवणाला चव येते. पण बुंदी रायता नीट जमून यायला हवा. बहुतांशवेळा बुंदी रायता ताकात बुंदी घालून केला जातो. त्यामुळे तो पातळ होतो आणि पांचटही लागतो. बुंदी रायता चविष्ट आणि दाटसर होण्यासाठी तो दह्यात करायला हवा. यासाठी घरचं दही वापरलं, घरीच ताजी बुंदी केली तर बुंदी रायता खमंग चवीचा लागतो.
Image: Google
बुंदी रायते कसे करावे?
2 कप दही, 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड, अर्धा चमचा लाल तिखट, तळणासाठी तेल, अर्धा चमचा साखर, अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा, गरजेनुसार पाणी घ्यावं.
Image: Google
बुंदी रायते करण्यासाठी ताजी बुंदी करावी. त्यासाठी एका भांड्यात बेसन पीठ घ्यावं. त्यात जिरे आणि बेकिंग सोडा घालावा. पीठ चांगलं मिसळून घ्यावं. यात हळूहळू पाणी घालावं घट्टसर मिश्रण तयार करावं. कढईत तेल घ्यावं. ते गरम करावं. तळणाच झारा घेऊन त्यावर तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घालून बारीक बुंदी पाडावी. मध्यम आचेवर बुंदी लालसर तळावी. बुंदी तळल्यावर लगेचंच कोमट पाण्यात घालावी. थोडा वेळ पाण्यात भिजू द्यावी.
Image: Google
रायते करण्यासाठी एका भांड्यात दही फेटून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ, जिरे पावडर , लाल तिखट आणि थोडी साखर घालावी. हे मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. पाण्यातून बुंदी पिळून घ्यावी. बुंदी फेटलेल्या दह्यात घालावी.ती दह्यात नीट कालवून घ्यावी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे रायते पुलाव, मसालेभातसोबत छान लागतो तसेच नुसता खाल्ला तरी चवीचा आनंद मिळतो.