तोंडी लावणे हा भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा प्रकार. आपल्याकडे ताट वाढताना उजव्या बाजूला जितके महत्त्व असते तितकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच डाव्या बाजूला असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटणी, लोणचं, पापड, भजी असं काही ना काही या बाजूला असतंच. हे सगळं दरवेळी वेगळं आणि तितकंच चटपटीत असावं अशी आपली इच्छा असते. महाराष्ट्रात साधारणपणे नेहमीच्या जेवणात आपण दाण्याची, लसणाची, तिळाची, खोबऱ्याची, जवसाची, मिरचीचा खर्डा असे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार करतो (Rajasthani Style Garlic Chutney Recipe).
पण महाराष्ट्राबाहेरही साऊथकडे आणि अन्य ठिकाणी थोड्या वेगळ्या चवीच्या चटण्या आवर्जून केल्या जातात. आज आपण अशीच एक राजस्थानी स्टाईलने केली जाणारी लसणाची चटणी पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरुन केली जाणारी ही चटणी पाहून तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल. अतिशय सुंदर स्वाद असणारी आणि थोडीशी झणझणीत अशी ही चटणी भाकरी, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते. या चटणीसाठी कोणकोणते जिन्नस लागतात आणि ती कशी करायची पाहूया..
साहित्य -
१. लसूण - ३ चमचे
२. तिखट - २ चमचे
३. धणे पावडर - १ चमचा
४. हळद - १ चिमूट
५. पाणी - १ कप
६. तेल - २ चमचे
७. जीरे - १ चमचा
८. तीळ - १ चमचा
९. आमचूर पावडर - १ चमचा
१०. साखर - अर्धा चमचा
११. मीठ - चवीनुसार
१२. कोथिंबीर - २ चमचे
कृती -
१. लसूण खलबत्त्यामध्ये चांगले कुटून घ्यायचे
२. मग ते एका बाऊलमध्ये काढून त्यात तिखट, धणे पावडर, हळद आणि थोडे पाणी घालून हे सगळे चांगले एकजीव करायचे.
३. कढईमध्ये तेल घेऊन त्यात जीरे आणि तीळ घालायचे. यामध्ये लसूण आणि तिखटाची केलेली पेस्ट घालायची.
४. वरुन आमचूर पावडर, साखर आणि मीठ घालून पुन्हा थोडेसे पाणी घालून हलवायचे.
५. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून ही झणझणीत चटणी भाकरी, पराठा किंवा फुलक्यासोबत खायला घ्यायची.