आपल्या रोजच्या जेवणात काहीतरी मस्त झणझणीत किंवा चमचमीत असावं असं आपल्याला वाटतं. पण रोजच्या रोज जेवणात असं काही असेलच असं नाही. सर्व प्रकारच्या भाज्या पोटात जायला हव्यात म्हणून साधारणपणे पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्याची उसळ, कोशिंबीर असे केले जाते. पण यातल्या काही भाज्या आपल्या नावडीच्या असण्याची शक्यता असते. नावडीची भाजी असली तरी अनेकदा ती खाण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी पानात तोंडी लावायला काही असेल तर आपली वेळ निभावून जाते. चटणी, लोणची, तळण हे पदार्थ अशावेळी आपल्याला साथ देतात (Rajasthani garlic chutney recipe).
आपण साधारणपणे दाणे-लसूण, जवस, खोबरं यांची चटणी करतो. फारतर आपण मिरचीचा खरडा किंवा ठेचाही करतो. पण आज आपण लसणाचा वापर करुन केली जाणारी एक अतिशय आगळीवेगळी अशी राजस्थानी लसणाची चटणी पाहणार आहोत. ही चटणी करायला सोपी असून चवीला अतिशय मस्त असल्याने जेवण झक्कास नाही झालं तरच नवल. पाहूयात या चटणीसाठी नेमके कोणते घटक लागतात आणि ती कशी करायची...
साहित्य -
१. आलं - १ ते २ इंच
२. लसूण – १० ते १५ पाकळ्या
३. लाल काश्मिरी सुकी मिरची - १५ ते २०
४. तेल – अर्धी वाटी
५. मीठ – चवीनुसार
६. आमचूर पावडर – अर्धा चमचा
७. जीरे - १ चमचा
कृती -
१. एका पॅनमध्ये तेल घालून ते मध्यम आचेवर गरम करुन घ्यायचे.
२. मिरच्या या तेलात घालून चांगल्या परतून घ्यायच्या आणि बाजूला काढून ठेवायच्या.
३. याच तेलात आधी लसूण घालून तो चांगला परतून घ्या, त्यानंतर यामध्येच आलं आणि जीरं घालून तेही काही मिनीटे चांगले परतून घ्या.
४. गॅस बंद करुन हे सगळे चांगले गार होऊद्या.
५. गार झाल्यावर मिक्सरमध्ये मिरच्या आणि तेलातले हे मिश्रण तेलासहीत मिक्सरच्या भांड्यात घाला.
६. यामध्ये आमचूर पावडर आणि मीठ घालून मिक्सरमध्ये हे सगळे चांगले बारीक करुन घ्या.
७. ही चटणी काचेच्या भांड्य़ात ठेवा जेणेकरुन ती जास्त दिवस चांगली राहील. तसेच ती फ्रिजमध्ये ठेवल्यास महिनाभर खाऊ शकता.