Join us  

करिना कपूरला आवडणारं पौष्टिक आणि चमचमीत राजमा सॅलेड, रेसिपी सोपी, चविष्ट ७ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 1:49 PM

Rajma Salad Easy Healthy Breakfast Recipe benefits of Rajma : पाहूयात हे सॅलेड कसे करायचे आणि राजमा खाण्याचे शरीराला होणारे फायदे...

रोज उठल्यावर नाश्त्याला काय करायचं असा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर कायमच असतो. सकाळच्या घाईत झटपट होणारे, पोटभरीचे आणि तरीही प्रोटीनयुक्त काहीतरी हवे असते. सतत पोहे, उपमा खाऊन शरीराला फारसे पोषण मिळत नाही. अशावेळी रात्री झोपताना राजमा भिजत घातले तर सकाळी १० मिनीटांत चविष्ट नाश्ता तयार होतो. किडनी बीन्स म्हणजे राजमा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय त्यामध्ये असणारी खनिजे आणि बी१२ शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. एरवी आपण विविध प्रकारची सॅलेड किंवा मिसळ करतो. त्याचप्रमाणे घरात सहज उपलब्ध असलेले पदार्थ घालून राजम्याचे सॅलेड केले तर? घरात सहज असेल ते काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, दाणे, पनीर, टोफू, शेव, कोथिंबीर यांसारख्या कोणत्याही गोष्टी आपण या सॅलेडला गार्निश करण्यासाठी वापरु शकतो (Rajma Salad Easy Healthy Breakfast Recipe benefits of Rajma). 

राजमा सॅलेडमधून शरीरास प्रथिनं, फायबर आणि ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात.  राजमा सॅलेड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. या सॅलेडचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. म्हणजे राजमा सॅलेड खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. या सॅलेडमध्ये प्रथिनं जास्त असल्यानं हे सॅलेड खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिचे डाएट आणि व्यायाम यासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी तिने राजा सॅलेड खात असल्याची पोस्ट केली होती. पाहूयात हे सॅलेड कसे करायचे आणि राजमा खाण्याचे शरीराला होणारे फायदे...

(Image : Google)

कसे कराल राजमा सॅलेड 

१. राजमा गरजेपुरते मीठ घालून कुकरला ४ ते ५ शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचा.

२. एका मोठ्या बाऊलमध्ये हा राजमा घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी किंवा घरात असतील त्या भाज्या बारीक चिरुन घालायच्या. 

३. वरुन आवडी प्रमाणे चाट मसाला, चिलीफ्लेक्स, मिरपूड घालायची जेणेकरुन या सॅलेडला आपल्याला हवी तशी चव येईल.

४. उन्ह्याळ्यात काकडी, किसलेली कैरी किंवा लिंबू वापरून या सॅलेडला आपण स्पेशल ट्विस्ट देऊ शकतो.

५. आवडत आसल्यास शिजवलेले कॉर्न्स, पनीर किंवा टोफूचे तुकडे, भिजवलेले दाणे घातल्यास याची चव आणखी वाढते. 

६. आवडीप्रमाणे यावर शेव, कोथिंबीर घातल्यास याला इंडियन मिसळचा फ्लेवर देता येतो. 

राजमा खाण्याचे फायदे

१. राजमा खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रमाणावर ऊर्जा मिळते. कारण राजमामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. जे शरीरातील चयापचय आणि ऊर्जा वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 

२. राजमामध्ये गुड कॅलरीज असतात. जे आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

३. राजमा शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

४. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम व्यतिरिक्त, प्रोटीन आणि फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवतात

५. यातील अँटिऑक्सिडंटस कर्करोगापासून बचाव करतात, यासह मुक्त रॅडिकल्सचे संरक्षण करतात.

६. यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळून येते जे केसांची योग्य निगा राखतात. व्हिटॅमिन-सी देखील आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे

७. राजमा खाल्ल्याने शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.