Join us  

राखी पौर्णिमा स्पेशल 'नारळ थाळी!' चटणीपासून भातापर्यंत सर्व पदार्थ नारळाचेच, ही थाळी करुन तर पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 7:00 PM

ताटात चटणीपासून भातापर्यंत सर्व पदार्थ ओल्या नारळाचे. त्यामुळे राखी पौर्णिमेला ओल्या नारळाचा कोणता पदार्थ करावा हा प्रश्नच सुटेल.

ठळक मुद्देओल्या नारळाची पोळी पुरणाच्या पोळीप्रमाणे खोबर्‍याचं सारण भरुन करावी.ओल्या नारळाच्या तिखट पुर्‍या एरवी नाश्त्यालाही छान लागतात.नारळी भात करताना भात शिजवून परातीत काढून त्यात गूळ/ साखर मिसळावी. आणि पुन्हा पातेल्यात घालून भाताला वाफ आणावी.

- राजश्री  शिन्दोरे

राखी पौर्णिमेला ओल्या नारळाच्या पदार्थांना महत्त्व. जेवणात एक तरी पदार्थ ओल्या नारळाचा हवा असा प्रत्येकीचा आग्रह. पण करायचं काय असा प्रश्न पडतोच. या प्रश्नाला उत्तर म्हणून जर आम्ही ओल्या नारळाच्या पदार्थांचं ताटच सुचवलं तर. ताटात चटणीपासून भातापर्यंत सर्व पदार्थ ओल्या नारळाचे. ओल्या नारळाचा कोणता पदार्थ करावा हा प्रश्नच सुटेल.

 ओल्या नारळाची चटणी

छायाचित्र- गुगल

ही चटणी करण्यासाठी फोडलेल्या नारळाचा अर्धा भाग खोवून, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे डाळ्या, अर्धा चमचा मोहरीची डाळ, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, चिमूटभर हिंग, आवडीप्रमाणे चिंच, साखर, मीठ घ्यावं. हे सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमधे वाटून त्याची जाडसर चटणी करावी.

ओल्या नारळाची कोशिंबीर

छायाचित्र- गुगल

1 वाटी नारळाचा चव, 1 वाटी गोड दही, मीठ, साखर, जिरे पूड, मिरी पूड, कोथिंबीर एकत्र करुन कोशिंबिर बनवावी.

ओलं नारळ आणि श्रावण घेवडा भाजी

छायाचित्र- गुगल

ही भाजी करण्यासाठी पाव किलो श्रावण घेवडा, 5-6 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, आमचूर पावडर, कोथिंबीर, 1 वाटी नारळाचा चव, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरे हे साहित्य घ्यावं.

ही भाजी करताना घेवडा धुवून बारीक चिरुन घ्यावा. तेल तापवून फोडणीचं साहित्य घालावं. हिरव्या मिरच्या बारीक चिरुन परतून घ्याव्यात. नंतर चिरलेला घेवडा टाकून तो परतून घ्यावा. त्यात मीठ घालावं आणि थोडं पाणी घालून झाकण ठेवावं. भाजी शिजल्यावर त्यात आमचूर पावडर, साखर, नारळाचा चव घालावा. हे घातल्यावर भाजीला मिनिटभर वाफवून घ्यावं. गॅस बंद करुन त्यावर चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.

ओल्या नारळ आणि अननस करी

छायाचित्र- गुगल

ही करी करण्यासाठी 1 वाटी नारळाचा चव, 1 मध्यम आकाराचं पिकलेलं अननस, लिंबा एवढा गुळाचा खडा, 1 छोटा चमचा गरम मसाला, मीठ, तेल, थोडं लाल तिखट, हिंग, मोहरी आणि कोथिंबीर हे साहित्य घ्यावं.

करी करताना आधी अननस सोलून त्याचे मध्यम काप करावेत. तेलात हिंग, मोहरीची फोडणी करुन अननसाचे तुकडे घालून ते परतून घ्यावेत. नंतर त्यात मीठ, तिखट, नारळाचा चव घालून झाकण ठेवावं. पाच मिनिटं वाफवल्यावर त्यात गुळाचा खडा आणि गरम मसाला घालावा. अर्धा कप पाणी घालावं. एक उकळी आणावी. गॅस बंद करुन कोथिंबीर घालावी.

ओल्या नारळाची पोळी

छायाचित्र- गुगल

पारीसाठी 1 कप मैदा, 2 मोठे चमचे तेल, मीठ एकत्र करुन मैदा मऊसर भिजवावा.

सारणासाठी 1 मोठा चमचा तूप घेऊन तुपावर थोडं बेसन भाजून घ्यावं. 1 वाटी खोवलेलं नारळ, 1 वाटी किसलेला गूळ, जायफळ, वेलची पूड सर्व एकत्र करुन सारण तयार करावं. पारीच्या पिठात पुरणासारखं सारण भरुन पोळ्या लाटून तुपावर खरपूस भाजाव्यात.

ओल्या नारळाच्या पुर्‍या

छायाचित्र- गुगल

खोवलेल्या नारळात जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण, कोथिंबीर, चिमूटभर साखर आणि चवीपुरती मीठ घालून सर्व साहित्य नीट एकत्र करुन घ्यावं.

गव्हाच्या पीठात थोडं तेलाचं मोहन आणि मीठ घालून कणिक दुधात भिजवावी. थोडा वेळ मुरु द्यावी. नंतर पीठाचे दोन छोटे गोळे घेऊन दोन पुर्‍या लाटाव्यात. त्यात नारळाचं सारण भरुन पुर्‍यांच्या कडा बंद कराव्यात. पुर्‍या तेलात लालसर तळून घ्याव्यात.

नारळी भात

छायाचित्र- गुगल

नारळी भात करण्यासाठी 2 वाट्या आंबेमोहोर तांदूळ, 2 वाटी किसलेला गूळ किंवा दीड वाटी साखर, 1 मोठ्या नारळाचा चव, 4 लवंग, 2-4 मिरे, 1 छोटा चमचा वेलची पूड, 4 मोठे चमचे साजूक तूप, मनुका आणि बदामाचे काप एवढं साहित्य घालावं.

नारळी भात करताना तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवावेत. नंतर निथळून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करुन लवंगा मिरी घालून तांदूळ घालावेत. तांदूळ दोन मिनिटं परतून घ्यावेत. त्यात चार वाट्या गरम पाणी घालून भात शिजवून घ्यावा. शिजलेला भात परातीत काढून त्यात नारळ, गूळ/साखर , वेलची पूड घालून ते चांगलं एकत्र करावं. परत पातेल्यात थोडं तूप घालून त्यात पसरुन घालावा. वरती मनुका आणि बदामाचे काप टाकून गॅसवर मंद आचेवर पातेलं ठेवावं. पातेल्यावर झाकण ठेवून भाताला एक वाफ आणावी. वाफ आल्यावर सर्व बाजूंनी तूप सोडावं. आणि गॅस बंद करुन पातेलं पुन्हा झाकूण ठेवावं.

( लेखिका नाशिकस्थित असून त्या पाककला, हस्तकला आणि  गृहसजावटीच्या वस्तू तयार करण्यात कुशल आहेत.)

rdshindore@yahoo.com