आपल्याकडची खाद्यसंस्कृती खूप समृद्ध आहे. त्यामुळेच तर प्रत्येक सणाला एका विशिष्ट पदार्थाचे महत्त्व जास्त असते. आता हेच बघा ना नागपंचमी आणि राखीपौर्णिमा हे एकाच महिन्यातले सण. पण तरीही नागपंचमीला पुरणाचे दिंड तर राखीपौर्णिमेला नारळी भाताचे महत्त्व आहे. आता राखीपौर्णिमेच्या दिवशी नारळीभात अगदी परफेक्ट कसा करायचा, असा प्रश्न पडला असेल, तर ही रेसिपी एकदा बघा. सोपी रेसिपी आहे (How To Do Narali Bhat Easily And Quickly?).शिवाय आपण साखरेऐवजी गूळ घालून भात करणार आहोत. त्यामुळे त्याची पौष्टिकताही निश्चितच वाढणार आहे. (Narali Bhat- Maharashtrian Recipe)
नारळीभात करण्याची रेसिपी
साहित्य
२ कप शिजवलेला तांदूळ
३ ते ५ वेलची
२ ते ३ लवंगा
८ ते १० काजू
६ ते ७ मनुका
दालचिनीचा छोटासा तुकडा
केशराच्या ७ ते ८ काड्या
१ कप गूळ
१ कप खोवलेला नारळ
४ टेबलस्पून तूप
रेसिपी
१. सगळ्यात आधी तांदूळ मोकळा शिजवून घ्या. यासाठी बासमती तांदूळ वापरावा.
२. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप टाका. तूप चांगले तापले की त्यात लवंगा, वेलची, दालचिनी टाका. ते परतून झाले की त्यामध्ये शिजवलेला भात टाकावा.
३. एकदा सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. त्यात अर्धा कप पाणी टाका. केशराच्या काड्या घाला आणि कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.
४. तोपर्यंत दुसऱ्या एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवा. तूप तापले की त्यात काजू आणि मनुका घालून परतून घ्या. काजू लालसर होईपर्यंत परतावे.
५. त्यानंतर त्यामध्येच खोवलेले नारळ टाकावे. सोनेरी रंगाचे होईपर्यंत ते परतून घ्यावे. नंतर त्यात गूळ घालावा. गूळ आणि नारळ एकजीव झाले की मग हे मिश्रण ज्या कढईमध्ये भात वाफवायला ठेवला आहे, त्या कढईमध्ये टाकावे.
६. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटांसाठी वाफ येऊ द्यावी. नंतर गॅस बंद करावा.
७. हा भात करताना आपण साखरेऐवजी गूळ घातला आहे. त्यामुळे रंग वापरण्याची गरज नाही.