शीतल मोगल (आहारतज्ज्ञ)
राम नवमी. आज सर्वत्र आनंदाने साजरी होणार. चैत्र नवरात्राचे उपवासही संपतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारा हा उत्सव. प्रसाद म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे उन्हाळ्यात थंडावा देणारे उत्तम स्रोत. उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने परंपरेनुसार घरोघर केले जाणारे हे पदार्थ अत्यंत पौष्टिक आणि चविष्टही असतात.या दिवशी उन्हाळ्यातील अमृत म्हणजेच कैरीचं पन्ह केलं जातं. कैरीमध्ये व्हिटामीन सी असल्याने ते डिहायड्रेशन होत नाही. कैरीत ॲण्टीऑक्सिडंट आणि फायबर असते त्यामुळे पचन सुधारते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात येणारी अस्वस्थता कमी होते. कॅलरीज कमी असल्याने वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त असते. गूळ तसाही लोह मॅग्नेशियम कॅल्शियम आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. जे उन्हाळ्यात आपल्याला ऊर्जा देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
दुसरा पदार्थ म्हणजे कैरी आणि हरभरा डाळीची चटणी. किंवा वाटली डाळ. ही अतिशय रुचकर लागते हरभरा डाळ पाण्यात भिजवून नंतर ती वाटून त्यात कैरी व हिरवी मिरची घालून ही डाळ वाटली जाते. नंतर त्यावर जिरं कढीपत्ता यांची फोडणी दिली जाते. हरभरा डाळ उष्ण असते परंतु ती जेव्हा पाण्यात भिजवून वाटली जाते तेव्हा ती शरीराला उत्तम प्रकारे थंडावा देते.
तसेच या दिवशी टरबूजही खाल्ले जाते. टरबूजात पाण्याचा अंश जास्त असल्याने ते उन्हाळ्यात पोटाला थंडावा देते. तसेच यात पाण्याचा अंश जास्त असल्याने डिहायड्रेशन होत नाही. तसेच काही ठिकाणी रामफळचा नैवेद्य दाखवला जातो यात विटामिन B6 मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केस सुधारतात. तसेच त्वचेवरील डागही कमी होण्यास मदत होते. मधुमेहासाठी रामफळ अतिशय उपयुक्त आहे, काही ठिकाणी थंड दुधात हे मिक्स करून त्याचे शिकरण किंवा मिल्कशेक केला जातो. त्यामुळे उत्तम फायबर मिळते.
चैत्रगौरीच्या हळदीकुंकूला मोगऱ्याचा गजरा देण्याची रीत आहे. मोगरा केसात असला किंवा घरात किंवा बागेत असला तरी त्याच्या सुगंधाने रणरणत्या उन्हात एक शरीर व मनाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात थंडावा देणारा उत्तम नैसर्गिक स्त्रोत मोगरा आहे. निसर्गाची ही आपल्यावरची कृपा समजून पारंपरिक आहार घेऊ. आनंदानं उत्सव साजरा करु.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. संपर्क : 8605243534)