रामनवमीनिमित्त सध्या सगळीकडे धार्मिक, भाविक वातावरण झाले आहे. यावर्षी आयोध्या मंदिरातील (Ayodhya temple) रामाच्या प्राण-प्रतिष्ठापना सोहळ्यानंतरची ही पहिलीच रामनवमी (Ram Navami 2024). त्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मंदिरांमध्ये तर मोठ्या धामधुमीत रामजन्मोत्सव होईलच. पण दुपारी बारा वाजता घरोघरीही रामजन्म साजरा केला जातो. रामजन्मानंतर रामाला नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी तांदळाची खीर हा एक खास पदार्थ बहुतांश प्रांतांमध्ये केला जातो. दक्षिण भारतात तर रामाला रामनवमीच्या दिवशीच तांदळाच्या खिरीचाच नैवेद्य असतो. रामलल्लाच्या आवडीची तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया.
तांदळाची खीर करण्याची रेसिपी
साहित्य
२ टेबलस्पून तांदूळ
अर्धा लीटर दूध
पाव कप साखर
२ टेबलस्पून बदामाचे काप
१ टीस्पून वेलची पूड
८ ते १० केशराच्या काड्या
कृती
सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर अर्धा तास तो पाण्यात भिजत घाला. या रेसिपीसाठी तुम्ही आंबेमोहर तांदूळ वापरला तर खीर आणखी सुगंधी होते. पण तो तांदूळ नसेल तर इतर कोणताही तांदूळ वापरू शकता.
यानंतर एका पातेल्यात दूध उकळायला ठेवा. तसेच एका वाटीत १ टेबलस्पून पाणी घेऊन त्यात केशराच्या काड्या टाकून ठेवा.
अर्धा तास तांदूळ भिजल्यानंतर ते पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची थोडी जाडीभरडी पेस्ट करा.
आता दुध थोडं तापलं आणि उकळायला सुरुवात झाली की त्यामध्ये तांदळाची पेस्ट टाका आणि हे मिश्रण १० ते १५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
यानंतर दुधात तांदूळ शिजला की नाही हे एकदा तांदूळ दाबून तपासून पाहा. तांदूळ छान मऊसूत झाला असेल तर मग त्या दुधात आता साखर घाला.
कुणी फोडणी घालतं कुणी तडका मारतं? पाहा देशभरातल्या भन्नाट फोडण्या- सांगा, तुम्हाला कोणती आवडते?
त्यानंतर बदामाचे काप, वेलची पूड आणि केशराच्या काड्या घालून ठेवलेलं पाणी टाका. पुन्हा एकदा सगळं मिश्रण ५ ते १० मिनिटे उकळून घ्या. यानंतर गॅस बंद करा.
तांदळाच्या या खिरीचा नैवेद्या रामाला दाखविल्यानंतर तुम्ही ती खीर गरमागरमही खाऊ शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता.