Join us  

रमजान ईद स्पेशल : शिरखुर्मा करण्याची पाहा परफेक्ट रेसिपी, चविष्ट शिरखुर्मा खा पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 10:08 AM

Ramadan Eid Special Sheer Khurma Recipe : शिरखुर्मा आवडतो तर यंदा घरी करुन पाहा.. सोपी रेसिपी

ईद हा वर्षातला मोठा सण, प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्ट्य असते आणि त्या सणाला आपण आवर्जून एखादा गोड पदार्थ करतो. त्याचप्रमाणे ईद म्हणजे शिरखुर्मा हे गणित ठरलेलेच. पारंपरीक पद्धतीने केला जाणारा शिरखुर्मा म्हणजे अतिशय पौष्टीक आणि चविष्ट असे मिष्टान्न. हे मिष्टान्न आपण घरीही करु शकतो. हा पदार्थ करायला अवघड असतो असा आपला समज असतो. मात्र योग्य प्रमाणात सगळे पादार्थ घेतले तर हा पारंपरीक शिरखुर्मा करणे काही फार अवघड काम नाही. बरेचदा आपण बाहेर किंवा मित्र-मैत्रीणींच्या घरी हा पदार्थ चाखलेला असतो पण हे मिष्टान्न नेमके कसे केले जाते पाहूया (Ramadan Eid Special Sheer Khurma Recipe)...

साहित्य 

१. तूप - अर्धी वाटी 

२. दूध - १ ते १.५ लिटर (सायीसकट)

३. खजूर - ३ ते ४ 

४. सुकामेवा - चारोळ्या, बदाम, पिस्ते, काजू, मनुके 

(Image : Google)

५. साखर - १ वाटी 

६. बारीक शेवई - पाव किलो 

७. वेलची पूड - अर्धा चमचा 

८. केशर - ४ ते ५ काड्या

कृती -

१. जवळपास १५ ते २० मिनीटे दूध चांगले आटवून घट्टसर करायचे. 

२. सुकामेव्याचे उभे काप करुन एका ताटलीत ठेवायचे

३. पॅनमध्ये तूप घेऊन त्यामध्ये शेवई चांगली खरपूस सोनेरी भाजून घ्यायची. 

४. शेवई काढून घेऊन त्याच पॅनमध्ये पुन्हा तूप घालून सुकामेवा चांगला परतून घ्यायचा. 

५. उकळत असलेल्या दूधात या शेवया आणि साखर घालून हे चांगले शिजवायचे. 

६. त्यानंतर सुकामेवा आणि वेलची पावडर, केशर घालून हे मिश्रण पुन्हा चांगले शिजवून घ्यायचे.

७. आवडीनुसार यामध्ये आपण खसखस, खोबऱ्याचा कीस, मिल्क पावडर असे काहीही घालू शकतो. 

८. गॅस बंद केल्यानंतर काही वेळात हा शिरखुर्मा घट्टसर व्हायला लागतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.ईद ए मिलाद