Join us  

वरण-आमटी खाऊन कंटाळलात? करा साऊथ इंडियन टोमॅटो रस्सम, उन्हाळ्यात पळालेली भूक येईल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 1:44 PM

Rassam Recipe Without Dal : एकीकडे भाताचा कुकर लावायचा आणि दुसरीकडे हे रस्सम करायचं

जेवणात आपल्याला पातळ काहीतरी लागतंच. नेहमीच भाजी पातळ असते असं नाही. मग आपण आमटी, साधं वरण, कढी, सार किंवा सूप असं काही ना काही करतोच. पण नेहमी एकाच चवीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं हवं असं आपल्याला वाटतं. यासाठीच झटपट होणारी आणि चविष्ट अशी रस्सम रेसिपी आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ उमा रघुरामन यांनी ही रेसिपी सांगितली आहे. आंबट-गोड चवीचे आणि परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल हे रस्सम भातासोबत अतिशय उत्तम लागते. आवडत असेल तर तुम्ही पोळीसोबतही ते ट्राय करु शकता. हे रस्सम डाळ न वापरता आणि डाळीचा वापर करुन असे दोन्ही प्रकारे करता येते. रात्रीच्या वेळी किंवा खूप भूक लागली असेल अशावेळी एकीकडे भाताचा कुकर लावायचा आणि दुसरीकडे हे रस्सम करायचे आणि गरम भातावर तूप घालून त्यावर हे घालून खायचे. अगदी १० मिनीटांत होणाऱ्या या रेसिपीसाठी कोणकोणते जिन्नस लागतात आणि हे रस्सम कसे करायेच पाहूया (Rassam Recipe Without Dal). 

साहित्य -

१. टोमॅटो - ३ 

२. रस्सम पावडर - २ ते २.५ चमचे 

३. मीठ - चवीनुसार 

४. चिचं - छोटा गोळा

५. कोथिंबीर - अर्धी वाटी 

६. तूप - १ ते २ चमचे 

७. मोहरी - १ चमचा 

८. हिंग - पाव चमचा 

९. कडीपत्ता - ५ ते ६ पाने 

कृती - 

१. टोमॅटोच्या वरच्या बाजूचे देठ काढून त्याचे ४ किंवा ६ काप द्यावेत ते एका पातेल्यात घालून त्यात पाणी घालून शिजवायला ठेवावेत.

२. याच पातेल्यात टोमॅटो शिजत असताना रस्सम पावडर, चिंचेचा कोळ, कडीपत्ता आणि मीठ घालावे. 

३. १० ते १२ मिनीटे पातेल्यावर अर्धवट झाकण ठेवून हे सगळे चांगले शिजवावे.

४. टोमॅटो चांगले मऊसर झाल्यावर जवळपास २ ते ३ ग्लास पाणी घालून यामध्ये पुन्हा थोडी रस्सम पावडर आणि कोथिंबीर घालून पुन्हा चांगले उकळू द्यावे.

५. रस्सम चांगले उकळल्यावर गॅस बंद करावा आणि दुसरीकडे फोडणीची तयारी करावी. 

६. छोट्या कढईमध्ये तूप घालून त्यात मोहरी आणि हिंग घालून फोडणी करावी आणि ती वरुन या रस्समवर घालावी. 

७. हे गरमागरम रस्सम भात आणि तूप खाल्ल्यास मन आणि पोट दोन्हीही तृप्त होते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.