Join us  

रथसप्तमी नैवेद्य : पारंपरिक तांदळाची खीर करण्याची खास रेसिपी, नैवेद्य असा की गोडवा वाढेल घरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2024 11:41 AM

Rathasaptami Special Naivedya rice kheer sweet dish recipe : यादिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.

रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा आणि त्याचे आभार मानण्याचा महत्त्वाचा दिवस. माघ महिन्यातील सप्तमीचा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो. सूर्य दररोज उगवतो आणि आपल्याला प्रकाश देतो त्यामुळे आपण दैनंदिन क्रिया सहज करु शकतो. म्हणूनच सूर्यदेवाची पूजा करण्याच्या या दिवसाला विशेष महत्त्व असते. माघ महिना हा मराठी महिन्यातील शेवटचा महिना असतो. मराठी वर्ष संपून नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांसाठीही हा महिना अतिशय महत्त्वाचा असतो. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या या कालावधीत हवामानात आणि आरोग्यातही बरेच बदल होत असतात. रथसप्तमीला घरोघरी पूजा करुन येणारा ऋतू, वर्ष चांगले जावे यासाठी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रात यादिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. तर दक्षिणेकडे पायसम हा खिरीसारखाच असणारा पारंपरिक पदार्थ केला जातो. हलवा, घेवर किंवा पुरणपोळीसारखे पारंपरिक मिष्टान्न या दिवशी केले जाते. आज आपण तांदळाच्या खिरीचा झटपट होणारा नैवेद्य या निमित्ताने पाहूयात (Rathasaptami Special Naivedya rice kheer sweet dish recipe) ... 

साहित्य -

१. तांदूळ - अर्धा ते पाऊण वाटी

(Image : Google)

२. साखर - १ वाटी 

३. दूध - अर्धा लिटर

४. काजू, बदाम, पिस्ता काप - आवडीनुसार 

५. वेलची पूड - पाव चमचा 

६. केशर - ५ ते ७ काड्या

७. ओल्या नारळाचा चव - १ वाटी 

कृती - 

१. तांदूळ कढईत परतून घ्यायचा आणि मग थोडा गार झाल्यावर मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करुन घ्यायचा. (आपल्या आवडीचा चांगला वास येणारा आंबेमोहोर, बासमती असा कोणताही तांदूळ तुम्ही या खिरीसाठी घेऊ शकता.)

२. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात हे मिक्सर केलेले तांदूळ घालून त्यामध्ये साधारण २ ग्लास पाणी घालून ते शिजवायला ठेवायचे. 

३. तांदूळ चांगला शिजत आला की त्यामध्ये तापवून घेतलेले अर्धा लीटर दूध आणि नारळाचा चव घालून पुन्हा चांगले शिजवून घ्यायचे.

४. उकळी येईपर्यंत मधे मधे हलवत राहायचे आणि साखर, वेलची पावडर, केशर घालून पुन्हा एकसाऱखे हलवून घ्यायचे. 

५. काही वेळाने यामध्ये काजू आणि बदाम, पिस्ते यांचे आपल्या आवडीप्रमाणे काप घालायचे. 

६. साधारणपणे २० मिनीटे खीर शिजवून घ्यायची. यामुळे सगळे जिन्नस चांगल्या पद्धतीने एकजीव होण्यास मदत होते. 

७. ही गरमागरम खीर पोळी, पुऱ्या किंवा अगदी नुसतीही छान लागते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.