Join us  

नाश्त्यासाठी करा १ वाटी रव्याचे आप्पे, १५ मिनिटांत आप्पे करण्याची झटपट पौष्टिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 10:56 AM

Rava Appe easy breakfast Recipe : नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हे रव्याचे आप्पे अतिशय चांगला पर्याय असतात.

रोज ब्रेकफास्टला नवीन पदार्थ काय करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. सतत पोहे, उपमा करुन आणि खाऊनही कंटाळा आलेला असतो. थंडीच्या दिवसांत तर गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. हिवाळ्यात बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात. अशावेळी या भाज्यांचा वापर करुन घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आप्पे अतिशय चविष्ट होतात. नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हे रव्याचे आप्पे अतिशय चांगला पर्याय असतात. तसेच करायलाही सोपे असल्याने झटपट होतात आणि वेगळं काही केलं म्हणून घरातले सगळेच खूश होतात. पाहूयात हे आप्पे करण्याची सोपी रेसिपी (Rava Appe easy breakfast Recipe)..

साहित्य -

१. रवा - १ ते १.५ वाटी 

२. दही - अर्धी वाटी

३. सोडा - अर्धा चमचा 

४. मीठ - चवीनुसार 

(Image : Google)

५. बारीक चिरलेला कांदा - अर्धी वाटी 

६. गाजर - अर्धी वाटी (किसलेले)

७. शिमला मिरची - अर्धी वाटी (बारीक चिरलेली)

८. टोमॅटो - १ (बारीक चिरलेला)

९. कोबी - अर्धी वाटी

१०. कोथिंबीर - अर्धी वाटी 

११. आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा

१२. जीरे- अर्धा चमचा 

१३. मिरची - १ ते २ 

१४ तेल - अर्धी वाटी 

कृती -

१. रव्यामध्ये दही, मीठ आणि पाणी घालून पीठ एकजीव भिजवून घ्यावे. 

२. यामध्ये आलं-लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे, जीरे आणि सोडा घालून पीठ पुन्हा एकजीव भिजवावे.

३. यामध्ये कांदा, टोमॅटो, किसलेल्या भाज्या आणि कोथिंबीर घालावी. 

४. १५ मिनीटे हे सगळे चांगले भिजवून ठेवावे

५. आप्पे पात्रात तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण घालावे.

६. एका बाजुने आप्पे झाले की उलटून दुसऱ्या बाजुने चांगले होऊ द्यावेत.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.