लहान मुलं अनेकदा पोळी नको म्हणतात. अशावेळी त्यांना पोळीशी जाम, सॉस असे काही लावून दिले तर मात्र ते आवडीने पोळी खातात. सॉस आणि जाममधून शरीराला विशेष पोषण मिळत नाही. अशावेळी आपल्या घरात कैरीचा छुंदा असेल तर पटकन मुलांना पोळीचा रोल देऊ शकतो. इतकेच नाही तर आजारपणात आपल्या तोंडाला चव नसते अशावेळी वरण भात किंवा खिचडीसोबत तोंडी लावायला आंबट-गोड छुंदा असेल तर तोंडाला चव येण्यास मदत होते. पूर्वी कैऱ्या आल्या की हा छुंदा गॅसवर न शिजवता उन्हात ठेवून मुरवला जायचा. पण आता जागा आणि वेळ असे सगळेच प्रश्न असल्याने आज आपण गॅसवर शिजवून परफेक्ट छुंदा कसा करायचा ते समजून घेऊया (Raw Mango Kairi Chunda Recipe)...
साहित्य -
१. कैऱ्या - ३ ते ४
२. साखर - १ मोठी वाटी
३. गूळ - १ मोठी वाटी
४. सैंधव - १ चमचा
५. मीठ - अर्धा चमचा
६. हळद - अर्धा चमचा
७. जीरे पूड - अर्धा चमचा
८. गरम मसाला - अर्धा चमचा
९. तिखट - अर्धा चमचा
कृती -
१. कैरी स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यावीत आणि कैरी किसून घ्यावी.
२. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कैरीचा किस, साखर आणि गूळ घालावे.
३. मध्यम गॅसवर चांगले शिजत असताना यामध्ये सैंधव, मीठ आणि हळद घालावी.
४. साखर आणि गूळ पातळ होईपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत चांगले हलवत राहावे
५. एकतारी पाक आला की की छुंदा तयार झाला असे समजावे आणि गॅस बंद करावा.
६. त्यानंतर यामध्ये जीरे पूड, गरम मसाला आणि तिखट घालून पुन्हा सगळे एकजीव करावे.
७. सुरुवातीला हा छुंदा पातळ दिसेल पण गार झाल्यानंतर तो घट्ट होतो. हा छुंदा पुरी, पोळी, थालिपीठ, धीरडे अशा कशासोबतही अतिशय चविष्ट लागतो.