Join us  

बिनतेलाचे, माठात घातलेले लोणचे ! करून तर पहा, कारळ्याचे कुल चमचमीत लोणचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 1:06 PM

लोणचे म्हणजे तेल आणि मीठ यांचा भरपूर वापर आणि त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक..... असा विचार करत असाल तर थोडेसे थांबा. तेल न टाकताही कारळाचे लोणचे करता येते आणि ते देखील अतिशय चवदार. 'हेल्थलव्हर्स'ने तर अजिबात चुकवू नये, अशी ही एक भन्नाट रेसिपी....

ठळक मुद्देज्वारीच्या भाकरीसोबत कारळाचे लोणचे अधिक चवदार लागते.ज्यांना अगदीच बिना तेलाचे लोणचे खाणे आवडत नसेल, त्यांनी ५ किलो कैऱ्यांसाठी अर्धी वाटी तेल टाकले तरी चालू शकते. 

शिवकन्या पाटील, औरंगाबाद जुलै महिन्याची सुरूवात झाल्यामुळे कैरी आता काही दिवसांचीच पाहूणी आहे. त्यामुळे कैरीचे चटकदार लोणचे घालण्यासाठी खूपच कमी वेळ राहिला आहे. लोणचे म्हणजे बरणीमध्ये अगदी वर सहज दिसून  येणारा तेलाच थर आणि लोणचे जास्त काळ टिकावे म्हणून मोकळ्या हाताने घातलेले भरपूर मीठ, असा  विचार सहज  कुणाच्याही मनात येतो. त्यामुळे अनेकजणी लोणचे घालणे आणि लोणचे खाणेही टाळतात. पण मुळातच लोणचे खूप आवडत असेल आणि केवळ आरोग्याच्या कारणामुळे लोणचे खाणे टाळत असाल, तर मात्र हे बिनातेलाचे कारळाचे लोणचे नक्की करून पहा. चव सांभाळणे आणि आरोग्य जपणे, या दोन्ही गोष्टी या लोणच्यातून सहज साध्य होतात. 

 

कारळाच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य ५ किलो कैरी, १ किलो कारळं, १०० ते १५० ग्रॅम हळद, १०० ग्रॅम लवंग, ५० ग्रॅम मेथ्या, लसूण, अर्धा किलो मीठ. 

लोणच्याची रेसिपी१. कैरी फोडून तुम्हाला आवडतील त्या आकारात फोडी करून घ्या.२. फोडी स्वच्छ धुवून घेऊन एका स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करून घ्याव्या. ३. लवंग आणि मेथ्या कढईत भाजून घ्याव्यात.

४. यानंतर कारळं, मेथ्या आणि लवंग मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. ५. मिक्सरमध्ये वाटलेला मसाला एका भांड्यात काढावा. यातच हळद, मीठ आणि लसूणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकाव्या. कारळाच्या लोणच्यात लसूण भरपूर घातला तर ते अधिक चवदार होते.६. यानंतर थोड्या- थोड्या फोडी घेऊन या मसाल्यामध्ये चांगल्या घोळून माठात भरत जाव्या.७. सगळे लोणचे भरून झाल्यानंतर एक स्वच्छ कपडा बांधून माठाचे तोंड झाकूण ठेवावे.८. सुरूवातीला काही दिवस दररोज लोणचे हलवावे.९. एक- दिड महिना झाल्यानंतर माठातले लोणचे काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवले तरी चालते.

 

माठात का भरावे लोणचे ?ग्रामीण भागात आजही माठांमध्ये लोणची टाकली जातात. माठामध्ये टाकलेले लोणचे अधिककाळ टिकते. याशिवाय लोणच्यातले अतिरिक्त मीठ आणि जास्तीचे पाणीही माठाची खापरं शोषून घेतात. मीठाचे प्रमाण कमी झाल्याने हे लोणचे अधिक आरोग्यदायी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असणारेही हे लोणचे खाऊ शकतात. लोणचे घालण्यासाठी नवा माठ घेऊ नये. एखादा वर्ष पाणी घालून वापरलेला माठ लोणचे घालण्यासाठी योग्य असतो.

(उद्योजक शिवकन्या पाटील या वैष्णवी बचत गटाच्या माध्यमातून औरंगाबाद येथे गृहउद्योग करतात.)

 

टॅग्स :अन्नपाककृतीमहाराष्ट्र