बाजारात आंब्याचा हंगाम आता कळसाला पोहोचला आहे . पण आंब्याच्या बरोबरीनं सध्या हिरव्यागार कैऱ्यांनीही गर्दी केलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कच्ची कैरी खाणं हे उत्तम मानलं जातं . शरीराला नैसर्गिक थंडावा कैरीमुळे मिळतो. कैरीचं सरबत, पन्हं हे लोकप्रिय आहेच पण कैरीचा समावेश आहारात चटणीपासून आमटीपर्यंत आणि लोणच्यापासून सलाडपर्यंत अनेक प्रकारे करता येतो. कैरीमुळे जीभेची आणि निरोगी आरोग्याची गरज एकाच वेळी भागवता येते.
कैरीत क आणि अ जीवनसत्त्व असतं. याचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो. कच्ची कैरी न शिजवता खाल्ल्यास कैरीतील गुणांचा फायदा शरीराला मिळतो. यासाठी कैरी किसून त्याचं सरबत, कैरीची चटणी, कैरी सलाड अशा स्वरुपात कैरी खाल्ल्यास त्याचा फायदा शरीरास होतो. कैरीतील क जीवनसत्त्वाचा उपयोग त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी होतो.
कैरीमुळे लिव्हर स्वच्छ होते. लहान आतड्यातून बिले नावाचा रस स्त्रवण्यास कैरीमुळे मदत होते. शिवाय कैरी आतड्यातील घातक सूक्ष्मजंतू मारते आणि आतडे स्वच्छ ठेवते. कैरीत अॅण्टिऑक्सिडण्टस भरपूर असल्यानं लिव्हरसंबंधीचे आजार यापासून रोखता येतात. कैरीमुळे शरीरातील पाणी रोखून धरलं जातं. शरीरातील सोडियम क्लोराइड, लोह यांचा घामाच्याद्वारे होणारा ऱ्हास कैरीच्या सेवनानं थांबतो.
पचनक्रिया सुधारण्यास कैरी मदत करते. शिवाय शरीरातील जास्त उष्मांकही कैरीमुळे जळतात. कैरीत कमी उष्मांक असतात आणि साखर नसल्यानं वजन कमी करण्यासाठी कैरी उत्तम मानली जाते. दातांचं आरोग्य सुधारण्याठी, मुख दुर्गंधी घालवण्यासाठी , हिरड्यातून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यसाठी कैरीतील तत्वं मदत करतात. कैरी दात किडण्यापासून रोखते. कैरीत पेक्टिन हा घटक आतड्याचं आरोग्य नीट राखतं. कैरीतील ब जीवनसत्त्वं बध्दकोष्ठता होवू देत नाही. गरोदरपणात होणारा उलट्यांचा त्रास थांबवण्यास कैरी उपयुक्त असते.
कैरी सेवनाचे विविध प्रकार
- कैरीचं सलाड
कैरीच्या बारीक फोडी कराव्यात. अननस, कोथिंबिर, टोमॅटो, लाल सिमला मिरची, कांद्याची पात चिरुन घ्यावी. त्यात उकडलेला मका, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबिर घालावी. संध्याकाळच्या स्न्नॅक्ससाठी कैरीचं सलाड उत्तम आहे.
- कैरीचं रस्सम
कैरी घ्यावी. ती मऊ होईपर्यंत उकळावी. कैरीचा गर काढावा. तीन कप पाणी घ्यावं त्यात कैरीचा गर , लाल तिखट, हळद, मीठ, गुळ टाकावा. या मिश्रणाला छान उकळी आणावी. एका पॅनमधे थोडं तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालावा. त्यात कैरीचं उकळलेलं मिश्रण घालावं आणि पुन्हा मिश्रणाला उकळी आणावी. हे रस्सम भूक वाढवतं शिवाय तोंडाला चवही आणतं
- कैरीची वाफवलेली चटणी
कैरीचे तुकडे वाफवून घ्यावेत . त्यात पाणी घालू नये. जीरे, मेथ्या, धने पावडर , मीठ, थोडं लाल तिखट आणि गूळ घालावा. ही चटणी जेवणाची चव वाढवते. पचनास मदत करते.
- कैरी-पुदिन्याची हिरवी चटणी
ही हिरवी चटणी जास्त आरोग्यदायी असते. पोटाच्या विविध समस्या सोडवण्यास फायदेशीर ठरते. कैरी, कोथिंबिर, थोडा पूदिना, हिरवी मिरची , मीठ घालून तयार केलेली ही चटणी भजी, कटलेट, कबाब यांच्यासोबत खावी. किंवा सॅण्डविच करताना हिरवी चटणी म्हणून वापरल्यास सण्डविचला वेगळी चव येते.
- कैरीचा लच्छा
गोड आणि मसालेदार असा हा लच्छा एक प्रकारचं लोणचं असतं. फक्त ते केल्याबरोबर लगेच खायचं असत्ं. ते साठवून ठेवता येत नाही. यात कैरी, काळ मीठ, मिरपूड, जिरेपूड , गुळ घातला जातो. हा लच्छा पोळी, पराठा, आणि पुरी सोबत खाल्ला ंजातो.