किचनमधील सगळ्या भांड्यांपैकी प्रेशर कुकरचा आपण सर्वात जास्त वापर करतो. डाळ, भात, भाजी, आमटी यापैकी कोणताही पदार्थ तयार करायचा म्हटलं की प्रेशर कुकर वापरतो. रोजच्या कामाच्या गडबडीत झटपट कमी वेळात स्वयंपाक करणे हा खूप मोठा टास्क असतो. वेळ आणि गॅसची बचत व्हावी यासाठी आपण शक्यतो प्रेशर कुकरचा वापर करतो . यामुळेच प्रेशर कुकर ही आपल्या स्वयंपाक घरातील अतिशय महत्वाची अशी एक गोष्ट आहे. किचनमधील प्रेशर कुकर हा उपयोगी असला तरीही त्यात अन्नपदार्थ तयार करणे काहीवेळा कठीण होऊन बसते(Common Pressure Cooker Problems and How to Fix Them).
प्रेशर कुकरमध्ये अन्नपदार्थ शिजवणे वाटते तितके सोपे नाही. जर आतील जास्तीची वाफ निघून गेली, किंवा कुकरच्या झाकणातून हवा बाहेर पडली तर अन्नपदार्थ योग्य पद्धतीने शिजवून तयार होत नाहीत. अनेकवेळा प्रेशर कुकरचे झाकण नीट बसत नाही यामुळे प्रेशर कुकरमध्ये योग्य प्रमाणात प्रेशर तयार होत नाही, परिणामी तांदूळ असो किंवा डाळी, कोणतेही अन्नपदार्थ जळू शकतात किंवा ते व्यवस्थित शिजून न येत कच्चेच राहतात. काहीवेळा आपला प्रेशर कुकर हा वापरुन इतका जुना झालेला असतो की त्यात योग्य पद्धतीने प्रेशर तयार होत नाही. कुकरच्या आतमध्ये जर योग्य प्रमाणात प्रेशर तयार झाले नाही तर आतील अन्नपदार्थ व्यवस्थित शिजत नाहीत. प्रेशर कुकरमध्ये प्रेशर तयार न होण्याची अनेक करणे असू शकतात. ती कारणं नेमकी कोणती ते पाहूयात(reasons that are responsible if pressure cooker is not working).
प्रेशर कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही कारण...
१. प्रेशर कुकरचे गॅस्केट :- प्रेशर कुकरमध्ये योग्य पद्धतीने प्रेशर तयार करण्याचे मुख्य काम कुकरचे गॅस्केट करते. प्रेशर कुकरच्या झाकणाभोवती असलेला काळा रबर म्हणजेच गॅस्केटमुळे प्रेशर कुकरमध्ये प्रेशर तयार होते. प्रेशर कुकरच्या या गॅस्केटशिवाय कुकरचे झाकण बसणार नाही आणि त्यामुळे या झाकणाच्या फटीतून हवा बाहेर पडू लागेल. कुकरच्या आतील अशी गरम हवा जर बाहेर पडली तर प्रेशर कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही. जर तुमच्या कुकरचे गॅस्केट जीर्ण किंवा खराब झाले असेल तर ते वेळीच बदला. याचबरोबर कुकरच्या झाकणावर योग्य पद्धतीने फिट बसणाऱ्याच गॅस्केटचा वापर करावा.
२.सेफ्टी व्हॉल्व्हमुळे प्रेशर तयार होत नाही :- तुमच्या प्रेशर कुकरच्या झाकणावर असणाऱ्या सेफ्टी व्हॉल्व्हमुळे योग्य पद्धतीने कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही. कुकरच्या झाकणावर एक लहान छिद्र असते, ज्यातून हवा बाहेर पडते.हाच व्हॉल्व्ह प्रेशर कुकरमध्ये योग्य पद्धतीने प्रेशर तयार न करण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा हा सेफ्टी व्हॉल्व्ह सैल होतो, तेव्हा आतील गरम वाफ बाहेर पडत राहते आणि यामुळेच आत प्रेशर तयार होऊ शकत नाही. यामुळे बिघडलेला सेफ्टी व्हॉल्व्ह दुरुस्त करुन घ्यावा.
३. शिट्टीमध्ये घाण साचल्यास :- प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये घाण साचल्याने देखील प्रेशर कुकरमध्ये योग्य पद्धतीने प्रेशर तयार होत नाही. प्रेशर कुकरची शिट्टी स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे आहे. जर त्यात काही साचले असेल तर ते घासून काढून टाका आणि पाण्याच्या दाबाने घाण साफ करा.
प्रेशर कुकरमध्ये योग्य पद्धतीने प्रेशर तयार करण्यासाठी...
१. अन्नातील पाण्याचे प्रमाण योग्य असावे :- कुकरमध्ये योग्य प्रमाणात पाणी असेल तेव्हाच वाफ तयार होईल. म्हणून, स्वयंपाक करताना अन्नातील पाण्याचे प्रमाण योग्य असावे हे लक्षात ठेवा.
२. रिमला कोणतेही नुकसान होऊ देऊ नये :- कुकरच्या काठावर कोणतीही घाण किंवा अन्न अडकले नसल्याची खात्री करा. याशिवाय रिम खराब झाल्यास झाकण नीट बंद होणार नाही. झाकण व्यवस्थित बंद आहे याची खात्री करण्यासाठी, कुकरचा रिम ओल्या कापडाने स्वच्छ करा.
३. गॅसची फ्लेम तपासा :- प्रेशर कुकरमध्ये योग्य पद्धतीने प्रेशर तयार करण्यासाठी गॅसची फ्लेम तपासणे देखील महत्वाचे आहे. गॅसची फ्लेम कमी असेल तर प्रेशर तयार होण्यास जास्त वेळ लागेल. यासाठी आधी गॅसची फ्लेम मोठी ठेवून प्रेशर तयार करावे नंतर गॅसची फ्लेम कमी करावी.
४. ओव्हरफिलिंग टाळा :- कधीकधी कुकर ओव्हरफिल केल्याने प्रेशरवरही परिणाम होतो. यामुळे प्रेशर रिलीज व्हॉल्व्ह ब्लॉक होऊ शकतात. यामुळे कुकर अन्नपदार्थांननी जास्त भरलेला नाही याची काळजी घ्या. कुकरच्या वेगवेगळ्या आकारानुसार त्यात अन्नपदार्थ शिजवा.
५. कुकरचे झाकण नेहमी व्यवस्थित बसवा :- जर कुकरचे झाकण नीट बंद होत नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने बसवले असेल तर कुकर नीट बंद होणार नाही. यामुळे देखील कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही.
६. सील, गॅस्केट तपासा :- प्रेशर कुकरचे सील किंवा गॅस्केट खराब झाल्यास किंवा व्यवस्थित बसलेले नसल्यास कुकरमध्ये योग्य पद्धतीने प्रेशर तयार होत नाही.