जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आता घरोघरी महिलांची कैरीचे लोणचे बनविण्याची जय्यत तयारी सुरू झाली असणार. लोणच्यासाठी कैऱ्या कुठून आणायच्या, यंदा कोणती नवी रेसिपी ट्राय करायची किंवा आपल्या त्या अमूक अमूक मावशीचे किंवा त्या अमक्या मैत्रिणीचे लोणचे फारच चटपटीत होत असते, त्यामुळे आपणही तिची रेसिपी फॉलो करूया, असे अनेक विचार आता तुमच्या मनात आकाराला येऊ लागले असणार. म्हणूनच तर यावर्षी ही एक चटपटीत रेसिपी ट्राय करा आणि पाहता क्षणीच खावे वाटणारे, तोंडाला पाणी आणणारे, चमचमीत आणि चटकदार लोणचे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवा.
लोणच्यासाठी कैरी निवडताना लक्षात ठेवा- लोणच्यासाठी कैरी निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मऊ पडलेल्या कैऱ्या अजिबात घेऊ नका.- लोणच्याची कैरी हाताला टणकच लागली पाहिजे.- कैरी अगदी अंबटच असायला हवी. - कैरी घेतली की लगेचच त्या दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी लोणचे टाका. नाहीतर कैरी पिकू लागेल आणि लोणचे नासण्याची शक्यता वाढेल.
साहित्यहिरवीगार कैरी, लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी किंवा मोहरीची डाळ, मेथ्या, मीठ, बडीशेप, लवंग, मिरे, जीरे, तेल.
कृती- सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्या. अगदी काेरड्या झाल्यानंतरच त्याच्या फोडी करून घ्या. फोडी जास्त बारीकही नकोत आणि जास्त जाडही नको.- नंतर चिरलेल्या फोडींमध्ये थोडी हळद आणि थोडे मीठ टाका. सगळ्या फोडींना ते व्यवस्थित लागेल, याची काळजी घ्या.- मीठ आणि हळद लागताच पाणी सुटू लागणाऱ्या या फोडी स्वच्छ पुसून कोरड्या केलेल्या बरणीत भरून ठेवा. - वरची कृती आदल्या दिवशी केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी लोणच्याचा मसाला तयार करा.- यामध्ये सर्वात आधी मोहरी किंवा मोहरीची डाळ, मीरे, लवंगा, जीरे, बडीशेप, मेथ्या हे पदार्थ एकेक करून कढईमध्ये चांगले भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. हा मसाला जाडसरच ठेवा.
- आता आदल्या दिवशी मीठ आणि हळद लावलेल्या फोडी बरणीतून एका मोठ्या भांड्यात काढा. त्याला आता भरपूर पाणी सुटले असेल, हे पाणी वेगळे काढून घ्या.- या फोडींमध्ये आपण केलेला मसाला, मीठ, हळद, तिखट आणि हवे असल्यास थोडा विकतचा लोणच्याचा मसालाही टाकू शकता.- सगळ्या फोडींना व्यवस्थित मसाला लागला, की मग त्या बरणीत भरा. बरणीच्या तळाशी थोडे मीठ नक्की टाका.- फोडी बरणीत भरल्यानंतर वरून तेल टाका. लोणच्यात टाकण्याचे तेल कडक तापवून पुन्हा थंड करा आणि त्यानंतरच लोणच्यात टाका.- १० ते १२ दिवस दररोज एका मोठ्या चमच्याने लोणचे हलवायला विसरू नका. जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही.- लोणच्याची बरणी नेहमी स्वच्छ सुर्यप्रकाश येईल आणि हवा खेळती राहील अशाच ठिकाणी ठेवा. - अशा पद्धतीने घातलेले लोणचे सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि वर्षभर हमखास टिकेल.