रात्रीच्या जेवणात काय करावे, हा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींसमोर असतो. तेच तेच पोळी, भाजी, भाकरी किंवा खिचडी असं नेहमीच जेवण करूनही कंटाळा येतो. काही तरी चटकदार, चव बदलणारं खावंसं वाटतं. पण पुन्हा असे पदार्थ खायचे म्हणजे रात्रीच्या वेळी जास्त जड होईल का असाही विचार मनात डोकावतो. म्हणूनच आरोग्यासाठी उत्तम, चवीला निराळं आणि खमंग असं काहीतरी रात्रीच्या जेवणात घ्यायचं असेल, तर महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ म्हणजेच बाजरीची खिचडी हा त्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. बाजरीच्या खिचडीला महाराष्ट्राच्या काही भागात बाजरीचा खिचडा असंही म्हणतात.
बाजरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेअसे म्हणतात की गहू आणि तांदूळ यांच्यापेक्षाही जास्त उर्जा बाजरीमध्ये असते. त्यामुळे शरीराला जेव्हा खूप जास्त उर्जेची गरज असेल, तेव्हा बाजरी अवश्य खावी. बाजरी खाल्ल्याने अंगात ताकद येते. त्यामुळे अशक्त किंवा आजारी व्यक्तीलाही हा पदार्थ देता येतो. बाजरी हा वेटलॉससाठी सगळ्यात उत्तम पदार्थ मानला जातो. याशिवाय बाजरीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम, फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने ती पचनक्रियेचे कार्य उत्तम होण्यासाठी मदत करते.
बाजरीच्या खिचडीसाठी लागणारे साहित्यबाजरी, मुगाची डाळ, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, पाणी, तेल, मीठ, लाल तिखट, शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग.
कशी करायची बाजरीची खिचडी?- बाजरीची खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी एक ते दोन वाट्या बाजरी घ्या आणि ती तासभर पाण्यात भिजू द्या.- साधारण एक तास झाल्यानंतर बाजरी पाण्यातून काढून घ्या आणि एका स्वच्छ कापडावर पसरून ठेवा.- दोन- तीन तास बाजरी वाळू द्यावी आणि त्यानंतर ती मिक्सरमधून काढावी.- बाजरीची अतिबारीक पावडर करू नये. कारण बाजरीच्या भातासाठी थोडेसे जाडे- भरडे मिश्रण चांगले लागते. आता अशा प्रकारे आपली बाजरी भात बनविण्यासाठी तयार झाली आहे.
- आता कुकरमध्ये तेल टाकवे आणि लसूण, मिरच्या, अद्रक, शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग असे सर्व साहित्य टाकून फोडणी करून घ्यावी.- यानंतर मिक्सरमधून काढलेला बाजरीचा भरडा एक वाटी असेल तर साधारण दाेन वाट्या पाणी कुकरमध्ये टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे आणि पाण्याला उकळी येऊ द्यावी.- पाण्याला उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये बाजरीचा भरडा टाकावा आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. यानंतर कुकरचे झाकण लावावे आणि मध्यम आचेवर एक शिटी होऊ द्यावी.
फोडणीला आहे खूप महत्त्वपारंपरिक बाजरीची खिचडी तयार झाल्यानंतर त्याची खरी चव रंगते ती आपण त्याच्यावर घातलेल्या फोडणीने. त्यामुळे खिचडी झाल्यावर त्यावर पुन्हा एकदा फोडणी घालावी. वरून घालणाऱ्या फोडणीसाठी लसूणाचा वापर जरा जास्त करावा. लसून खमंग लालसर तळल्या गेला की भाताची चव अधिकच चवदार होते. भात डिशमध्ये वाढून घेतल्यानंतर त्याच्यावरून फोडणी घालावी आणि मग तो भात गरमागरम खावा. ज्याप्रमाणे तांदळाच्या खिचडीवर आपण वरून तूप घेतो, त्याचप्रमाणे बाजरीच्या खिचडीवर फोडणी घेण्यात येत असते.