Lokmat Sakhi >Food > भगर लगदा होते किंवा फडफडीत, छान मऊ मोकळी टेस्टी भगर कशी कराल? उपवास स्पेशल रेसिपी

भगर लगदा होते किंवा फडफडीत, छान मऊ मोकळी टेस्टी भगर कशी कराल? उपवास स्पेशल रेसिपी

भगर- आमटी करण्याचा कंटाळा आला आहे, मग मस्तपैकी भगरीची खिचडी करा. खाण्यास  खमंग आणि करायला सोपी... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 03:41 PM2021-08-23T15:41:24+5:302021-08-23T15:42:31+5:30

भगर- आमटी करण्याचा कंटाळा आला आहे, मग मस्तपैकी भगरीची खिचडी करा. खाण्यास  खमंग आणि करायला सोपी... 

Recipe of bhagar or varicha bhat, best option for fast | भगर लगदा होते किंवा फडफडीत, छान मऊ मोकळी टेस्टी भगर कशी कराल? उपवास स्पेशल रेसिपी

भगर लगदा होते किंवा फडफडीत, छान मऊ मोकळी टेस्टी भगर कशी कराल? उपवास स्पेशल रेसिपी

Highlightsउपवासाच्या दिवशी सकाळचा नाश्ता किंवा रात्रीच्या वेळी काही हलके- फुलके खाण्याची इच्छा असल्यास हा एक उत्तम पदार्थ आहे.

उपवासासाठी भगर हा एक सर्वोत्तम पदार्थ आहे. भगर पचायला हलकी असल्याने उपवासाच्या दिवशी भगर खाणे तब्येतीच्या दृष्टीने चांगले असते. पण भगर आणि आमटी हे दोन्ही पदार्थ करणे वेळेअभावी अनेक जणींना शक्य नसते. त्यामुळे भगर आणि आमटी असा पदार्थ टाळायचा असेल, पण चवदार, खमंग लागणारी भगरीची खिचडी खायची असेल, तर ही एक मस्त रेसिपी नक्की ट्राय करा. भगरीच्या खिचडीला वरीचा भात किंवा फोडणीची भगर असेही म्हटले जाते. उपवासाच्या दिवशी सकाळचा नाश्ता किंवा रात्रीच्या वेळी काही हलके- फुलके खाण्याची इच्छा असल्यास हा एक उत्तम पदार्थ आहे. अशा पद्धतीने केलेली भगर उपवास व्यतिरिक्त अन्य दिवशीही नाश्ता म्हणून खाता येते.

 

भगरीची खिचडी करण्यासाठी लागणारे साहित्य
एक मध्यम आकाराची वाटीभर भगर, तीन हिरव्या मिरच्या, दोन टेबलस्पून तूप, जिरे, शेंगदाण्याचा कुट, पाणी, दही आणि चवीनुसार मीठ.

कशी करायची भगरीची खिचडी?
- भगरीची खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी भगर स्वच्छ धुूवून घ्या आणि तिच्यातील पाणी निथळून घ्या.
- आता गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवावी.
- कढई तापल्यावर त्यात तूप घालावे.
- तूप गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकावेत. जिरे तडतडले की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावेत. 
- मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या की त्यामध्ये धुतलेली पण पाणी निथळून टाकलेली ओलसर भगर टाकावी.
- दोन ते तीन मिनिटे भगर तुपामध्ये आणि फोडणीमध्ये परतून घ्यावी.


- भगर परतत असताना ती कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे भगर वारंवार हलवावी.
- भगर परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकावे. साधारण भगरीच्या वर अर्धे बोट पाणी येईल, अशा पद्धतीने पाण्याचे प्रमाण ठेवावे.
- पाण्याला उकळी येऊ लागली की त्यामध्ये दोन टेबलस्पून दही आणि चार टेबलस्पून दाण्याचा कुट आणि चवीनुसार मीठ टाकावे. सगळे मिश्रण हलवून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- यानंतर भगरीवर झाकण ठेवावे आणि चांगली वाफ येऊ द्यावी.


- दोन मिनिटांनी कढईवरचे झाकण काढून पहावे. भगरीला पाणी कमी पडते आहे, असे लक्षात आले तर पाणी गरम करावे आणि नंतर भगरीमध्ये टाकावे. गार पाणी टाकणे टाळावे.
- भगरीला वाफ आली आहे आणि ती शिजली आहे, असे लक्षात येताच गॅस बंद करावा आणि गरमागरम भगर सर्व्ह करावी. 
- दही नसल्यास भगरीमध्ये लिंबू पिळले तरी चालते. पण लिंबू किंवा दही यांचा वापर अवश्य करावा. यामुळे भगरीची चव अधिकच रूचकर लागते.

 

Web Title: Recipe of bhagar or varicha bhat, best option for fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.