Join us  

Recipe : दुधीची भाजी पाहून मुलं नाक मुरडतात? करा हे ३ हटके पदार्थ, भोपळा पोटात जाण्याचे सोपे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 1:24 PM

Recipe : घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असे भोपळ्याचे ३ हटके प्रकार आज पाहूयात. जेणेकरुन भोपळाही पोटात जाईल आणि घरातील मंडळी नाकही मुरडणार नाहीत.

ठळक मुद्देकोफ्ता करी हॉटेलसारखी लागत असल्याने ती भोपळ्याची आहे हे घरातील लोकांना सांगितल्याशिवाय लक्षातही येणार नाही.  गरमागरम पराठे दही, लोणचे, हिरवी चटणी, सॉस अशा कशासोबतही खाऊ शकता. 

उत्तम आरोग्यासाठी सगळ्या भाज्या आहारात असायला हव्यात हे आपल्याला माहिती आहे. असे असले तरी काही भाज्या समोर आल्या की आपली जेवायची इच्छाच जाते. यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ती म्हणजे दुधी भोपळा (bottle gourd). आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारी भोपळ्याची भाजी शिजल्यावर पिचपिचीत होते आणि आपला जेवणाचा मूडच जातो. मग दुधीचा हलवा, दुधी भोपळ्याचे दही घालून रायते असे प्रकार आपण करतो. पण त्यापेक्षाही थोडे हटके पदार्थ केले तर, या पदार्थांमुळे (Recipe) ही भाजी अगदी आनंदाने पोटात जाईल. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असे भोपळ्याचे ३ हटके प्रकार (Cooking Tips) आज पाहूयात. जेणेकरुन भोपळाही पोटात जाईल आणि घरातील मंडळी नाकही मुरडणार नाहीत.

(Image : Google)

१. कोफ्ता करी

कोफ्ता करी करण्यासाठी भोपळा सालं काढून किसून घ्या. त्यामध्ये बेसन, किखट, मीठ, तीळ, धने-जीरे पावडर, ओवा, कोथिंबीर असे सगळे घालून त्या मिश्रणाचे कोफ्ते तळून घ्या. दुसरीकडे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि खोबरं यांची मिक्सरमध्ये ग्रेव्ही करुन घ्या. कढईमध्ये फोडणी घालून त्यामध्ये ही पेस्ट घाला. ती चांगली परतली की त्यात गोडा मसाला, तिखट, गूळ आणि मीठ घालून ते चांगले उकळू द्या. वाटीत गरमागरम करी घेऊन त्यामध्ये तळलेले कोफ्ते घाला आणि पोळी किंवा भाकरीसोबत खा. ही कोफ्ता करी हॉटेलसारखी लागत असल्याने ती भोपळ्याची आहे हे घरातील लोकांना सांगितल्याशिवाय लक्षातही येणार नाही. 

२. भोपळ्याचे पराठे 

आपण ज्याप्रमाणे कोबी, मूळा यांचे पराठे करतो, त्याचप्रमाणे भोपळ्याचे पराठे करायचे. गव्हाच्या पीठात भोपळा किसून त्यामध्ये आलं, मिरची लसूण पेस्ट घाला. त्यात हळद, हिंग, धने जीरे पावडर, मीठ, तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. भोपळ्याला पाणी सुटत असल्याने हे पीठ भिजवताना पाणी घालू नका. नाहीतर पराठे लाटता येणार नाहीत. हे गरमागरम पराठे दही, लोणचे, हिरवी चटणी, सॉस अशा कशासोबतही खाऊ शकता. 

(Image : Google)

३. थालिपीठ 

अनेकदा आपण भाजणीचे थालिपीठ करतो. या थालिपीठामध्ये आपण कांदा घालतो, त्यासोबत भोपळा किसून घातल्यास लक्षातही येत नाही आणि भोपळा पोटात जातो. घरात थालिपीठाची भाजणी नसेल तर ज्वारी, बाजरी, बेसन, गहू अशी कोणतीही पिठे किसलेल्या भोपळ्यात घालायची. त्यामध्ये तिखट, मीठ, धने जीरे पावडर आणि भरपूर कोथिंबीर घालून तव्यावर थालिपीठ लावायचे. हे गरमागरम थालिपीठ तूप, लोणी किंवा दह्यासोबत खायचे. भोपळा किसलेला असल्याने त्यामध्ये भोपळा आहे हे लहान मुलांना कळतही नाही. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.