रात्री बाहेर खाणं झालं किंवा संध्याकाळीच थोडं जास्त काही खाल्लं की रात्री पोळी नको वाटते. मग आमटी-भात किंवा वरण भातावरच रात्रीचे जेवण होते. अशावेळी उरलेल्या पोळ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता हे ठरलेले असते. शिळी पोळी आरोग्यासाठी चांगली असते, त्यातून लोह किंवा आणखी काही घटक मिळतात आणि सकाळची नाश्ता वाचतो. त्यामुळे कधी चहा-पोळी किंवा फोडणीची पोळी नाश्त्याला अनेकांकडे खाल्ली जाते. इतकंच नाही तर पोळीचा खाकरा, गूळ तूप पोळीचा लाडू यांसारखे थोडे वेगळे पदार्थही केले जातात (Healthy Breakfast Option). मात्र शिळ्या पोळीचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला आणि घरातील सगळ्यांनाही कंटाळा येतो (Recipe from Leftover Roti). अशावेळी याच पदार्थाचे थोडे हटके तरीही टेस्टी आणि हेल्दी काही केले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ते आवडीने खातात (Chapati Noodles by MasterChef Pankaj Bhadouria).
आता हटके म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर शिळ्या पोळ्यांपासून आपण अतिशय चविष्ट अशा नूडल्स बनवू शकतो. लहान मुलांसाठी तर नूडल्स हा प्रकार भलताच आवडीचा असतो. पण नूडल्स म्हटले की त्यात मैदा ओघानेच आला. पण घरात केलेल्या पोळ्यांपासून ते बनवायचे असतील तर मैद्याचा प्रश्नच नाही. तसंच या पदार्थातून भरपूर भाज्या पोटात जात असल्याने एरवी मुलं ज्या भाज्या पाहून नाक मुरडतात तो भाज्या खाण्याचा प्रश्नही दूर होतो. तसंच रोज उठून नाश्त्याला नवीन काय करायचं असा प्रश्नही दूर होऊ शकतो. प्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरीया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आगळ्यावेगळ्या पौष्टीक नूडल्सची रेसिपी शेअर केली आहे. त्या नेहमीच आपल्या चाहत्यांना काही ना काही हटके टिप्स देऊन तर कधी एखादी भन्नाट रेसिपी सांगून खूश करत असतात. पाहूया चपाती नूडल्सची खास रेसिपी...
साहित्य -
१. शिळ्या पोळ्या - असतील तेवढ्या
२. गाजर - अर्धी वाटी (किसलेले)
३. कोबी - अर्धी वाटी (पातळ उभा चिरलेला)
४. शिमला मिरची - अर्धी वाटी (पातळ उभी चिरलेली)
५. कांदा - १ (उभा चिरलेला)
६. लसूण - ५ ते ६ पाकळ्या (बारीक केलेल्या)
७. तेल - २ चमचे
८. मीठ - चवीपुरते
९. मीरपूड - अर्धा चमचा
१०. सोया सॉस - अर्धा चमचा
११. टोमॅटो सॉस - १ चमचा
१२. तीळ - अर्धा चमचा
१३. कोथिंबीर - (पाव वाटी बारीक चिरलेली)
कृती -
१. शिळ्या पोळीचे रोल करुन ते बारीक कापून घ्यायचे.
२. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या घालून ते चांगले परतायचे.
३. यामध्ये पोळ्यांचे उभे तुकडे घालून सगळे एकसारखे हलवायचे.
४. यामध्ये मीठ, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मीर पूड घालायची.
५. हे सगळे एकत्र करुन हलवत राहायचे आणि शेवटी त्यामध्ये तीळ आणि कोथिंबीर घालायची.
६. हे गरमागरम नूडल्स नाश्त्याला खायला घ्यायचे.