गणपती, दिवाळी या दिवसांत घरी मिठाई, पेढे येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. शिवाय घरी पाहूणे येणार म्हणून आपणही मुद्दाम जास्तीची मिठाई (recipe from leftover sweets and mithai) आणून ठेवतो. त्यात बऱ्याचदा असं हाेतं की घरी येणारे अनेक जणं पण मिठाईच घेऊन येतात. मग आता या सगळ्या मिठाईचं काय करायचं (what to do with leftover mithai?), हा खरोखरंच एक प्रश्न असतो. या मिठाईमध्ये जर पेढ्यांचं आणि बर्फीचं प्रमाण जास्त असेल तर मग त्यांच्यापासून पेढ्यांच्या पोळीचा खास बेत तुम्ही करू शकता. बघा पेढ्यांची पोळी करण्याची ही सोपी रेसिपी.
एरवी आपण जेव्हा पेढ्याची पोळी करतो तेव्हा ती खवा आणून केली जाते. काही ठिकाणी तिला पेढ्यांची पोळी न म्हणता खव्याची पोळीही म्हटलं जातं. खव्याची पोळी करताना खवा आधी थोडा परतून घ्यावा लागतो. नंतर त्यात चवीनुसार साखर घालून हलवून घ्यावं लागतं. आणि मग हे मिश्रण थंड झालं की त्यापासून खव्याची किंवा पेढ्याची पोळी करता येते. पण आता आपल्याकडे पेढा तयार आहे म्हटल्यावर असं काहीही न करता चटकन पोळी लाटता येईल. शिवाय पेढा फ्रिजमध्ये ठेवलेला असेल तर २- ३ दिवस तुम्ही या रेसिपीसाठी पेढा वापरू शकता. पण त्यापेक्षा जुना असलेला पेढा वापरू नका.
कशी करायची पेढ्याची पोळी?- पेढ्याची पोळी करण्यासाठी आलेल्या पेढ्यांपैकी साधारण जे पेढे- मिठाई सारखी असेल, ती वेगळी करून घ्या.- सगळ्या पेढ्यांचे तुकडे करून ते हाताने कालवून व्यवस्थित एकजीव करून घ्या.- पेढा छान एकजीव झाला की त्याची छानशी पोळी लाटता येते.- त्यासाठी थोडी मऊसर कणिक भिजवून घ्या. कणकेचा एक छोटा गोळा हातात घेऊन तो हातानेच थोडा पसरवा. त्यात पेढ्याचा छोटा गोळा ठेवा. कणिकेने तो व्यवस्थित कव्हर करा आणि पुरीपेक्षा थोडी मोठी पोळी लाटा.- या पोळीवर तूप टाकून, खालून- वरून भाजून छान खरपूस करून घ्या.