Join us  

फोडणीचा भात तर नेहमीचाच, आता शिळ्या भाताला द्या स्पाईसी तडका; करा मस्त पनीर पुलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 6:06 PM

How to make paneer pulao: भात उरला तर त्याला फोडणी घालणं नेहमीचंच. फोडणीचा भात (rice) करून आणि खाऊन कंटाळा आला असेल, तर करून बघा स्पाईसी पनीर पुलाव.. 

ठळक मुद्देफक्त उरलेल्या भातासोबतच ही रेसिपी करता येते असे मुळीच नाही. तुम्ही फ्रेश भात लावूनही पनीर पुलाव करू शकता. 

भात उरला की दुसऱ्या दिवशी त्याला फोडणी द्यायची. फोडणीत कांदा, मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे टाकायचे, हे तर आपलं नेहमीचं ठरलेलं. हा भात तर चवदार लागतोच, त्यात काही वाद नाही. अनेक घरांमध्ये तर असा फोडणीचा भात अतिशय आवडीने खाल्ला जातो. पण आता या भातासोबत थोडा वेगळा प्रयोग करून बघा. उरलेल्या भाताला थोडा स्पाईसी, झणझणीत तडका द्या आणि बनवा मस्त, झकास पनीर पुलाव... भात तोच पण तडका मारायची स्टाईल वेगळी.. करून बघा ही स्पाईसी रेसिपी (paneer pulao recipe in marathi).

 

फक्त उरलेल्या भातासोबतच ही रेसिपी करता येते असे मुळीच नाही. तुम्ही फ्रेश भात लावूनही पनीर पुलाव करू शकता. बऱ्याचदा कुणी पाहूणे जेवायला येणार असतील तर साधा भात ठेवावा की आणखी काही करावं, असा नेहमीचा प्रश्न. जीरा राईस, फ्राईड राईस, मसाले भात असे प्रकार नेहमीचचे. म्हणूनच मग अशावेळी भाताचा काही वेगळा प्रकार करावा वाटत असेल तर चटपटीत पनीर पुलाव नक्की करून बघा. अतिशय झटपट होणारा हा पनीर पुलाव करायलाही सोपा आहे. शिवाय चव बदलल्यामुळे आणि त्यात पौष्टिक पनीरही असल्यामुळे तो सगळ्यांना आवडूनही जातो. 

 

कसा करायचा पनीर पुलाव?How to make paneer pulao?- पनीर पुलाव करण्यासाठी आपल्याला पनीर, शिजवलेला भात, तेल, कांदा, गाजर, मटार, अद्रक- लसूण पेस्ट, तिखट, मीठ, बटर, हिरव्या मिरच्या, चाटमसाला, टोमॅटो, गरम मसाला असं साहित्य लागणार आहे.- सगळ्यात आधी तर आपल्याकडचा उरलेला भात मोकळा करून घ्या. जर फ्रेश राईसचा पुलाव करणार असाल तर आपण पुलाव करण्यासाठी जसा तांदूळ शिजवून घेतो, तसे तांदूळ शिजवा आणि मोकळा भात करून घ्या.- यानंतर एका कढईमध्ये एक टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून बटर टाका.

- बटर आणि तेल चांगले गरम झाल्यावर त्यात कांदा टाकून तो परतून घ्या.- कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक- लसूण पेस्ट टाका.- यानंतर बारीक चिरलेले गाजर, मटार टाका आणि परतून घ्या.- भाज्या परतून झाल्या की बारीक चिरलेला टोमॅटो टाका आणि परतून घ्या.- या भाज्यांमध्ये आता थोडे तिखट, थोडा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका आणि हलवून घ्या.- भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये चौकोनी आकारात एकसारखे कापलेले पनीर टाका.- पनीर आणि भाज्या व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

- आता त्यामध्ये शिजवलेला भात टाका.- भात टाकल्यानंतर पुन्हा थोडेसे मीठ, तिखट आणि गरम मसाला टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- सगळ्यात शेवटी भातावरून पुन्हा थोडे बटर टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि सगळे मिश्रण हलवून हलकी वाफ येऊ द्या.- चांगली वाफ आली की गरमागरम तवा पनीर पुलाव सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स