Join us  

Recipe of 3 Vegetable Paratha’s : मुलांना अजिबात न आवडणाऱ्या भाज्यांचे करा ३ प्रकारचे चविष्ट पराठे, नावडत्या भाज्यांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 1:11 PM

Recipe of 3 Vegetable Paratha’s : नाक मुरडल्या जाणाऱ्या भाज्यांचे पराठे केले की ते आवडीने खाल्ले जातात, त्यामुळे नकळत भाज्याही पोटात जातात.

ठळक मुद्देनाश्ता किंवा जेवण अशा कोणत्याही वेळेला पराठा खाऊ शकतो. यासोबत खोबऱ्याची चटणी, दही, लोणचे, सॉस असे काहीही छान लागते. 

रोज रोज भाजी-पोळी म्हटलं की मुलं आणि मोठेही हमखास नाक मुरडतात. त्यातही मुलांच्या नावडीच्या भाज्या असल्या की तर मुलं हमखास डबा तसाच घरी आणतात. या भाज्या कितीही चांगल्या केल्या तरी त्या खाताना वैताग केला जाणे अगदीच सामान्य आहे. घरोघरी हीच परिस्थिती असल्याने सतत वेगळ्या कोणत्या भाज्या करायच्या आणि सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न महिलावर्गापुढे असतो. (Recipe of 3 Vegetable Paratha’s) तर दुसरीकडे मुलांनी आणि घरातील सगळ्यांनीच पौष्टीक खायला हवे आणि त्यातून त्यांना पोषण मिळायला हवे असेही वाटत असते. (Option for Roti-Sabji) अशावेळी आहे त्यातच थोडे डोके चालवून वेगळे काही करायचा प्रयत्न केल्यास घरातल्या मंडळींना ते लक्षात तर येत नाहीच, पण वेगळं काहीतरी दिल्याने ते अतिशय आनंदाने खाल्ले जाते (Healthy Meal). 

(Image : Google)

नाक मुरडले जाणाऱ्या भाज्या म्हणजे मुळा, कोबी आणि दुधी भोपळा. पण या तिन्ही भाज्यांमध्ये अतिशय चांगले गुणधर्म असून आरोग्यासाठी या भाज्या अतिशय उपयुक्त असतात. कोबी आणि मुळ्याच्या भाजीला एकप्रकारचा उग्र वास येत असल्याने या भाज्या अनेकांना आवडत नाही. तर दुधीची भाजी केल्यानंतर थोडी मऊ होत असल्याने ती खाणे टाळले जाते. पण शरीराचे चांगले पोषण होण्यासाठी सगळ्या भाज्या खाणे अतिशय आवश्यक असते. वेगवेगळ्या प्रकारे केल्या तरी सारखी पोळी-भाजी खाणे कंटाळवाणे होऊ शकते. अशावेळी या भाज्यांचे पराठे, पुऱ्या केल्यास त्या आवडीने खाल्ल्या जातात आणि अनेकदा त्यामध्ये आपण करताना कोणती भाजी घातली असेल हे लक्षातही येत नाही. 

साहित्य -

१. कोबी किंवा मुळा किंवा दुधी - किसलेला २ वाट्या 

२. आलं- मिरची-लसूण पेस्ट - एक चमचा 

३. धनेजीरे पावडर - अर्धा चमचा

४. हळद - अर्धा चमचा 

५. ओवा - पाव चमचा

६. तीळ - अर्धा चमचा 

७. मीठ - चवीनुसार 

८. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी

९. गव्हाचे पीठ - ३ वाट्या 

१०. तेल - ३ चमचे 

(Image : Google)

कृती - 

१. परातीत कणीक घेऊन त्यात आलं-मिरची-लसूण पेस्ट, तीळ, धनेजीरे पावडर, ओवा, मीठ, हळद सगळे घालून कोरडेच एकजीव करायचे.

२. यामध्ये ज्या भाजीचे पराठे करायचे आहेत ती किसलेलील भाजी आणि कोथिंबीर, एक चमचा तेल घालून पीठ चांगले मळून घ्यायचे. 

३. या पीठात पाणी घालताना कमी घालायचे. भाजी आणि मीठ एकत्र आल्यावर पीठाला पाणी सुटत असल्याने जास्त पाणी झाल्यास पराठे लाटताना चिकटतात आणि लाटणे अवघड जाते. 

४. १० ते १५ मिनीटे पीठ भिजल्यावर त्याचे एकसारखे गोळे करुन पराठे लाटावेत किंवा पुऱ्या करुन त्या तळाव्यात. 

५. हे दोन्ही पदार्थ नाश्ता किंवा जेवण अशा कोणत्याही वेळेला खाऊ शकतो. यासोबत खोबऱ्याची चटणी, दही, लोणचे, सॉस असे काहीही छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाज्या