पावसाळ्यात किंवा एरवीही आपण बाहेर फिरायला गेलो की हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर आवर्जून ऑर्डर करतो ती भाजी म्हणजे पनीरची. यामध्ये कधी मटार पनीर, पालक पनीर तर कधी कढाई, हंडी किंवा भुर्जी आवर्जून ऑर्डर केली जाते. ही भुर्जी गरमागरम नान, फुलके, रोटी यांच्यासोबत इतकी छान लागते की आपण अगदी तुडुंब जेवतो. पनीरमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी पौष्टीक तर असतेच शिवाय उन्हाळ्यात भाज्या महाग असल्याने आणि पटकन वाळून जात असल्याने पनीर हा भाजीसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो (Recipe Of Dhaba Style Paneer Bhurji).
जेवण पौष्टीक तर होईलच पण घरातले सगळेच त्यामुळे तुमच्यावर नक्की खूश होतील. अशी भुर्जी घरी करायला गेलो तर त्याला ढाबास्टाईल चव येत नाही. मग हे लोक यामध्ये नेमकं काय घालतात आणि ती का चविष्ट होते ते समजून घेऊयात. भुर्जीमध्ये घातल्या जाणाऱ्या ग्रेव्हीमध्येच त्याचा सगळा फ्लेवर अवलंबून असतो. ही भुर्जी परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...
साहित्य -
१. पनीर - पाव किलो
२. कांदा - १
३. टोमॅटो - १
४. मीठ - चवीनुसार
५. बेसन - अर्धी वाटी
६. तिखट - अर्धा चमचा
७. हळद - पाव चमचा
८. कसुरी मेथी - १ चमचा
९. गोडा मसाला किंवा किचन किंग, पनीर मसाला - १ चमचा
१०. दही - अर्धी वाटी
११. दूध - अर्धा कप
१२. . तेल - २ चमचे
१३. बटर - २ चमचे
१४. मिरच्या - १ ते २
१५. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. पनीरचा बारीक चुरा करुन घ्यायचा.
२. एका बाऊलमध्ये भाजलेले बेसनाचे पीठ घेऊन त्यात कसुरी मेथी, हळद, मसाला, मीठ घालून सगळे एकत्र करायचे.
३. मग त्यात दही, दूध आणि तिखट घालून हे मिश्रण एकजीव करुन बाजूला ठेवून द्यायचे.
४. कढईत तेल घालून त्यामध्ये बटर घालायचे आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा.
५. मग यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या आणि टोमॅटो घालून हे सगळे चांगले परतून घ्यायचे.
६. नंतर बाऊलमध्ये तयार केलेले मिश्रण यामध्ये घालायचे आणि यातले तेल वेगळे होत नाही तोपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे.
७. तेल वेगळे झाले असे वाटले की यामध्ये बारीक केलेले पनीर घालायचे.
८. नंतर अंदाज घेऊन थोडेसे पाणी घालायचे म्हणजे ते सरबरीत होण्यास मदत होते.
९. वरुन भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आवडत असल्यास लिंबू पिळायचे.
१०. स्लाईस कांदा सोबत घेऊन नान किंवा गरम रोटी, फुलके यासोबत ही बुरजी अतिशय चविष्ट लागते.