'आई.... भूक लागली......पण काहीतरी मस्त कर हं....तेच ते घरातलं काहीतरी नको..' अशी मुलांची हाक दिवसातून एकदा तरी कानावर येतेच येते. घरात चिवडा, लाडू, स्वयंपाक असं खूप काही तयार असतं, पण मुलांना यातील काहीच नको असतं. याशिवाय दुसरे म्हणजे मुलांसाठी काहीही करताना ते कितपत हेल्दी आहे, असा विचारही त्यांच्या आई हमखास करतातच. म्हणूनच मसाला पोळी रोल ही अतिशय सोपी पण तेवढीच यम्मी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पोळ्या किंवा चपाती वापरून हा पदार्थ तयार करण्यात येत असल्याने तो पौष्टिक तर असतोच पण त्यामुळे पोटही व्यवस्थित भरते. म्हणूनच नाष्टा म्हणूनही हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही.
मसाला पोळी रोलसाठी लागणारे साहित्य
पोळ्या, तूप, टोमॅटो सॉस, बारीक शेव, तिखट, चाट मसाला, कांदा आणि तुम्हाला सिमला मिरची, कोबी अशा ज्या भाज्या कच्च्या खाणं आवडत असेल त्या सगळ्या भाज्या.
कृती
१. मसाला पोळी रोल करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर तवा तापत ठेवा.
२. तवा थोडा गरम झाला की त्यावर तूप सोडा आणि तयार असलेली पोळी त्याच्यावर टाकून खालून, वरून खमंग भाजून घ्या.
३. यानंतर पोळी तव्यावरच ठेवून पोळीच्या वरच्या बाजूवर सगळीकडे टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घ्या.
४. आवडीनुसार तिखट टाकून ते ही सगळीकडे नीट पसरवून घ्या.
५. यानंतर बारीक चिरलेला कांदा पोळीवर टाका.
६. सिमला मिरची, कोबी, गाजर किंवा ज्या भाज्या कच्च्या खाता येतात, अशा कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार अगदी बारीक चिरून पोळीवर टाका. या पदार्थाला आणखी हेल्दी बनविण्यासाठी पनीरही टाकू शकता.
७. भाज्या टाकल्यानंतर बारीक शेव टाका आणि त्यानंतर चाट मसाला टाका.
८. आता सगळ्यात शेवटी यावर चीज किसून टाका आणि रोल करून मुलांना गरमागरम सर्व्ह करा.
ही काळजी घ्या...
ही सगळी रेसिपी आपल्याला तव्याखाली गॅस चालू असतानाच करायची आहे. त्यामुळे गॅस अगदी मंद असला पाहिजे. जेणेकरून पोळीवर सगळे पदार्थ टाकून होईपर्यंत खालून ती पोळी जळणार नाही. शिवाय सगळ्या भाज्या चिरून तयार असल्यावरच रेसिपी करायला घ्यावी, म्हणजे पटापट रोल तयार करता येतील.