रोज काय भाजी करायची असा प्रश्न तमाम महिलांपुढे असतो. शाकाहारी असणाऱ्यांना तर सारख्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. शाळा, कॉलेज किंवा ऑफीसला जात असू तर डब्यात कोरडी भाजी आणि पोळी यांना पर्याय नसतो. पण संध्याकाळी घरात असल्यावर किंवा विकेंडच्या दिवशी वेगळं काहीतरी हवं असतं. भाजी पोळी असली तरी सोबत पातळ काहीतरी लागतंच. मग उसळ, आमटी असं काही ना काही केलं जातं. पावसाळ्याच्या दिवसात तर बाहेर गारठा असताना गरम वाफाळतं काही ताटात असेल तर नक्कीच ४ घास जास्त खाल्ले जातात. पावसाचे गार वातावरण असल्याने दही, ताक थोडे कमीच घेतले जाते. पण याच दह्याची किंवा ताकाची चविष्ट आणि थोडी वेगळ्या पद्धतीची कढी केली तर?
भात, पोळी, भाकरी अशा कशासोबतही अतिशय मस्त लागणारी कढी आपण नेहमीच करतो. आंबट-गोड चवीची ही कढी फुरके मारत प्यायला छानही लागते. पण पंजाबमध्ये केली जाणारे कढी वडे हा पदार्थ आपण क्वचितच ट्राय केला असेल. एकीकडे पावसाळ्यात भाज्या महागल्या असताना किंवा सतत त्याच त्या भाज्या आणि आमट्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही झटपट रेसिपी आपण नक्की ट्राय करु शकतो. ताकाची डाळीचं पीठ, कढीपत्ता आणि मेथ्या घालून कढी आपण नेहमीच करतो. पण ही कढी थोडी वेगळी असल्याने पावसाळी वातावरणात जेवणाची लज्जत वाढवणारी ठरते. पाहूयात झटपट होणार कढी वड्यांची रेसिपी...
साहित्य -
१. दही - १ ते १.५ वाटी
२. साखर - १ चमचा
३. मीठ चवीनुसार
४. फोडणीसाठी - जीरे, हिंग, हळद, आलं
५. मिरच्या - ३ ते ४
६. कडीपत्ता - ६ ते ७ पाने
७. डाळीचे पीठ - १ वाटी
८. ओवा - अर्धा चमचा
९. हिंग, हळद, तिखट, मीठ - वड्याच्या पीठासाठी
१०. कोथिंबिर - अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
११. तेल - अर्धी वाटी
कृती -
१. डाळीच्या पीठात मीठ, ओवा, तिखट, हिंग, हळद घालवून ते घट्टसर भिजवून घ्यायचेय
२. या पीठाची भजी तळून घ्यायची.
३. कढीसाठी दह्याचे ताक करुन घ्या, त्यामध्ये साखर मीठ घालून ते चांगले घुसळून घ्या.
४. कढीला फोडणी देण्यासाठी तेलात जीरे, कडीपत्ता, आलं, हिंग, हळद घाला.
५. फोडणीमध्ये ताक घालून चांगली उकळी येऊ द्या.
६. यामध्ये तळलेले वडे घालून वरुन कोथिंबीर घाला आणि गरमागरम कढी घ्या.