घुघरा हे नाव ऐकायला थोडे वेगळे जरूर आहे. पण हा पदार्थ मात्र खरोखरच चटकदार आहे. अभिनेत्री समीरा रेड्डी 'Sassy Saasu and Messy Mama' या नावाने तिचे आणि तिच्या सासुबाईंचे म्हणजेच मंजिरी वर्दे यांचे काही व्हिडियोज नेहमीच तिच्या सोशल अकाउंटवरून शेअर करत असते. सासू- सुनेचा बॉण्ड आणि एकमेकींवरचे प्रेम आता या व्हिडियोच्या माध्यमातून जगजाहीर झाले आहे. या दोघींनी मिळून नुकताच एक व्हिडियो तयार केला आहे. यामध्ये मंजिरी वर्दे यांनी गुजराथी घुघरा या पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे.
मंजिरी यांच्या मते घुघरा हा पदार्थ थेट पंजाबी सामोश्याला टक्कर देणारा आहे. किंबहुना त्यापेक्षाही अधिक चटकदार आणि हेल्दी आहे. सामोसा पंजाबी आहे की नाही, हा एक नविन विषय त्यांच्या या व्हिडियोला येणाऱ्या कंमेटमधून समोर आला आहे. पण खरे खवय्ये असाल तर सामोसा पंजाबी आहे की अन्य कोणत्या प्रांतातला आहे, या वादात पडू नका. त्यापेक्षा घुघरा आणि सामोसा या दोन्ही डिश कोसळणाऱ्या पावसात मस्तपैकी एन्जॉय करा..
घुघरा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
एक कप कणिक, दोन ते तीन टेबलस्पून रवा, एक टेबलस्पून तुप, मीठ, मटार, हिरव्या मिरच्या, जीरेपुड कोथिंबीर आणि किसलेले नारळ
कसा बनवायचा घुघरा
- सगळ्यात आधी तर कणिक, रवा आणि तूप एका बाऊलमध्ये घ्या आणि पाणी टाकून चांगले मळून घ्या. हे पीठ सैलसर भिजवू नका. जरा घट्टच असू द्या.
- यानंतर सोललेले मटार दाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे साहित्य मिक्सरमधून वाटून घ्या. या मिश्रणाची एकदमच बारीक पेस्ट करू नका. जरा ओबडधोबड मिश्रण चांगले लागते.
- वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि आता यामध्ये किसलेला नारळ, जीरेपुड आणि चवीनुसार मीठ टाका.
- आता कढईमध्ये तेल तापत ठेवा.
- भिजवलेल्या कणकेचे पुऱ्या करताना घेतो तसे लहान लहान गोळे करून घ्या. एक लहान गोळा पीठ लावून पुरी एवढ्या आकाराचा लाटून घ्या. यामध्ये आता आपण तयार केलेले सारण भरा. करंजी करताना जशी आपण मुरड घालतो, तशी मुरड घालून लहान लहान करंज्या करून घ्या आणि त्या तळून काढा.
- सॉस किंवा लोणच्यासोबत गरमागरम घुगरे अतिशय टेस्टी लागतात.