Join us  

अशा पद्धतीने बनवा पारंपरिक कुस्करा, नक्कीच होईल स्वादिष्ट आणि खाऊन सगळेच म्हणतील वाह क्या बात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 1:04 PM

कुस्करा म्हणजे मराठी माणसांचा अगदी फेव्हरेट पदार्थ. त्यातही मराठवाड्यात तर जवळपास प्रत्येक घरातच कुस्करा प्रेमी सापडतात. फोडणीची पोळी म्हणूनही काही घरांमध्ये कुस्करा ओळखला जातो. याशिवाय 'माणिक पैंजन' हे अतिशय गोड नावही काही ठिकाणी कुस्कऱ्याला लाभलेले आहे. कुस्करा बनविण्याची ही चटपटीत रेसिपी एकदा अवश्य ट्राय करून पहा.

ठळक मुद्देरोजच्या रोज कुस्करा खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. पण आठवड्यातून एखाद्या दिवशी कुस्करा खाल्ला तर त्याने तब्येतीवर कोणताही विपरित परिणाम होत नाही.ब्रेड, टोस्ट, सामोसे, वडापाव असे मैद्याचे पदार्थ खाण्याऐवजी एखाद्या दिवशी कुस्करा खाणे कधीही उत्तमच असते.मराठवाड्यात इतके कुस्कराप्रेमी आहेत की, कधीकधी खास कुस्करा करण्यासाठी पोळ्या आवर्जून बाजूला काढून ठेवल्या जातात.

आता स्वयंपाकाच्या बाबतीत अनेक जणी स्मार्ट झाल्या आहेत. त्यामुळे अगदी प्रत्येकाच्या मोजून पोळ्या केल्या जातात आणि रात्री तेवढ्या पोळ्या संपूनही जातात. पण कधीतरी काहीतरी अचानक प्लॅन बदलतो. कुणी बाहेरूनच जेवून येतं किंवा मग सगळे मिळूनच हॉटेलिंगचा आनंद घेतात. अशावेळी पोळ्या उरतात. मग दुसऱ्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा आवर्जून केला जातो. कुस्करा हा पारंपरिक पदार्थ असला तरी प्रत्येक घरी तो बनविण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. म्हणूनच या वेगळ्या पद्धतीने जर कुस्करा बनविला तर खाणारे नक्कीच वाह वा म्हणतील आणि ज्यांना कुस्करा आवडत नाही, त्यांनाही आवडू लागेल.

 

कुस्करा बनविण्यासाठी लागणारे साहित्यउरलेल्या पोळ्या, तेल, मोहरी, कांदा, टोमॅटो, तिखट, हळद, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, मीठ आणि साखर

कुस्करा बनविण्याची कृती१. सगळ्यात आधी उरलेल्या पोळ्या अगदी व्यवस्थित चुरून घ्या. मिक्सरमधून फिरवून घेतल्या तरी चालेल. पण फार बारीक चुरा करू नये.२. गॅसवर कढई तापत ठेवावी. त्यामध्ये तेल- मोहरी टाकून फोडणी करून घ्यावी.३. फोडणी झाल्यावर हळद टाकण्याआधी शेेंगदाणे टाकावेत. शेंगदाणे तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यावेत.४. यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि तो चांगला परतून घ्यावा.

५. एक कांदा घेतला असेल तर तेवढ्याच आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. कांदा परतल्यानंतर चिरलेले टोमॅटो घालावेत आणि ते देखील चांगले परतून घ्यावेत.६. आता या मिश्रणात हळद आणि लाल तिखट घालावे. कढीपत्त्याची पाने टाकावीत आणि आता कढईवर झाकण ठेवून एक मिनिटे चांगली वाफ येऊ द्यावी.७. चांगली वाफ दिल्यामुळे कांदा आणि टोमॅटो एकजीव होतील. आता त्यामध्ये पोळ्यांचा चुरा टाकावा. चवीनुसार मीठ घालावे आणि थोडी साखर टाकून चांगले हलवून घ्यावे.८. टोमॅटो टाकूनही जर कुस्करा कोरडा वाटत असेल तर त्यावर अगदी थोडेसे ताक शिंपडावे आणि चांगली वाफ येऊ द्यावी.९. यानंतर वरून कोथिंबीर घालावी आणि गरमागरम कुस्करा सर्व्ह करावा. १०. लोणचे, दही यासोबतही कुस्करा मस्त लागतो.

 

या गोष्टी लक्षात ठेवा१. कुस्करा बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोळ्या जास्त शिळ्या नसाव्यात.२. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत असल्याने कुस्करा बनविणे टाळावे.३. पोळ्या उरल्या तर त्या फ्रिजमध्ये ठेवाव्यात.  

टॅग्स :अन्नपाककृती