Lokmat Sakhi >Food > कतरिना विकीच्या लग्नात लाल केळीचे पदार्थ; ही केळी मिळतात कुठं, खाण्याचे फायदे काय? लाल केळीचे 2 पदार्थ 

कतरिना विकीच्या लग्नात लाल केळीचे पदार्थ; ही केळी मिळतात कुठं, खाण्याचे फायदे काय? लाल केळीचे 2 पदार्थ 

कतरिना विकीच्या लग्नातल्या लाल केळीच्या ऑर्डरमुळे लाल केळींची चर्चा होते आहे. लाल केळीत असलेल्या पोषक गुणधर्मामुळे हे केळं पौष्टिक असतं. चवीला स्वादिष्ट असणार्‍या या लाल केळाचे कुरकुरीत पदार्थ चहासोबतही मजा आणतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 03:16 PM2021-12-08T15:16:36+5:302021-12-08T15:32:49+5:30

कतरिना विकीच्या लग्नातल्या लाल केळीच्या ऑर्डरमुळे लाल केळींची चर्चा होते आहे. लाल केळीत असलेल्या पोषक गुणधर्मामुळे हे केळं पौष्टिक असतं. चवीला स्वादिष्ट असणार्‍या या लाल केळाचे कुरकुरीत पदार्थ चहासोबतही मजा आणतात.

Red banana's food in Katrina Vicky's wedding; Why red banana is important for health, how to eat it? | कतरिना विकीच्या लग्नात लाल केळीचे पदार्थ; ही केळी मिळतात कुठं, खाण्याचे फायदे काय? लाल केळीचे 2 पदार्थ 

कतरिना विकीच्या लग्नात लाल केळीचे पदार्थ; ही केळी मिळतात कुठं, खाण्याचे फायदे काय? लाल केळीचे 2 पदार्थ 

Highlightsकेळांच्या सर्व प्रकारांपैकी लाल केळात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असतं. हे गुण रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाचे मानले जातात.कॅन्सर, हदयरोग, मधुमेह आणि डोळ्यांच्या संबंधित आजारांचा धोका टाळण्यासाठी लाल केळ खाणं ठरतं फायदेशीर.पिवळ्या केळाच्या तुलनेत लाल केळ खाणं लाभदायक ठरतं.

सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचीच चर्चा प्रसारमाध्यमांमधे सुरु आहेत. त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवलं जातंय. पण या लेखाचा विषय हा कतरिना आणि विकीचं लग्न किंवा त्यातील थाटमाट हा नाही. तर विषय आहे लाल केळीचा. आता या लाल केळी मधेच कशाला? तर याला कारण म्हणजे कतरिना आणि विकी कौशलचं लग्न. त्यांचा लग्नाच्या मेन्यूतील अनेक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे लाल केळी असणार आहे. या लग्नासाठी 150 किलो लाल केळींची ऑर्डर देण्यात आली आहे. या बातमीच्या निमित्तानं लाल केळींबद्दल काही खास आणि उपयुक्त सांगावं यासाठी हा लेख आहे.

Image: Google

आपल्याला हिरवी केळी, पिवळी केळी, वेलची केळी, केरळची लांब मोठी केळी पाहून खाऊन दोन्ही पध्दतीने माहिती आहेत. जगभरात केळीचे हजारो प्रकार आहेत. त्यातील आणखी एक प्रकार म्हणजे या लाल केळी. ही केळी नरम आणि गोड असतात. तसेच या केळींचा आकारही छोटा असतो. लला केळीचं उत्पादन पूर्व आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका, संयुक्त अरब अमीरात येथे होतं. भारतातही लाल केळी पिकवली जातात. प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि केरळमधे लाल केळींचं उत्पादन घेतलं जातं.

लाल केळ खाण्यास जितकं रुचकर आहे तितकंच ते आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. कारण यात आरोग्यास लाभदायक असे अनेक पोषक घटक असतात. आपल्याकडे मिळत नसतील तर कुठे मिळतात त्याचा शोध घेऊन लाल केळी आवर्जून खायला हवीत एवढी ती पोषक आहेत.

Image: Google

लाल केळी आरोग्यदायी.. ती कशी?

1. लाल केळात अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात जे शरीरासाठी पोषक असतात आणि शरीराचं आजारांपासून संरक्षण करण्याच्या ताकदीचे असतात. केळांच्या सर्व प्रकारांपैकी लाल केळात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असतं. या दोन घटकांच्या विशिष्ट प्रमाणामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास या लाल केळाचा फायदा होतो. लाल केळावर वैज्ञानिकांनी अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान काही लोकांना नियमित 20 दिवस दोन लाल केळी रोज खाण्यास सांगितली. त्याचा काय परिणाम होतो हे तपासलं असता त्यांना आढळून आलं की लाल केळींच्या नियमित आणि र्मयादित सेवनामुळे रक्तदाब कमी झाला. लाल केळात असलेले फाइटोकेमिकल्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

2. लाल केळात केरोटिनॉइड जास्त प्रमाणात असतात. त्यामुळेच या केळींच्या सालीचा रंग लाल असतो. ल्यूटिन आणि बीटा केरोटिन हे घटक लाल केळात असतात. हे दोन केरोटिनॉइड डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.

3. लाल केळावर झालेलं संशोधन सांगतं, की लाल केळांमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असतं. अँण्टिऑक्सिडण्टस एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लाल केळीतील अँण्टिऑक्सिडण्टस पेशींचा नाश करणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. कॅन्सर, हदयरोग, मधुमेह आणि डोळ्यांच्या संबंधित आजारांसाठी कारणीभूत असलेले मूक्त मुलक अर्थात फ्री रॅडिकल्सचा धोका अँण्टिऑक्सिडण्टसमुळे टळतो.

Image: Google

4. लाल केळात ब6 हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. या जीवनसत्त्वाचा उपयोग शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास होतो. तसेच रक्तातील लाल पेशीही वाढतात. ब6 या जीवनसत्त्वामुळे चयापचय क्रिया सुधारते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास चयापचय क्रिया चांगली असणं महत्त्वाचं असतं. तसेच लाल केळात क जीवनसत्त्वंही असतं. त्यामुळेच लाल केळ हे अँण्टिऑक्सिडण्टसच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं गेलं आहे.

5. लाल केळामुळे पचन सुधारतं. याबाबत झालेला अभ्यास सांगतो, की लाल केळातील रेझिस्टेन्स स्टार्च हा आतड्यांच्या कार्यावर परिणाम करतं. यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. लाल केळ पचनास सुलभ तर असतंच. पण डायरिया सारख्या त्रासात या केळातील पोटॅशिअममुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटची कमतरता भरुन निघते.

6. 100 ग्रॅम लाल केळात 89 उष्मांक, 74.91 ग्रॅम पाणी, 0.33 ग्राम फॅटस, 1.09 ग्राम प्रथिनं, 22.84 ग्रॅम कबरेदकं, 26 ग्रॅम फायबर, 12.23 ग्रॅम साखर, तसेच कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम ही खनिजं क आणि ब6 ही जीवनस्त्त्वं भरपूर प्रमाणात असतात. लाल केळात फोलेटही 20 मायक्रोग्राम असतं.

 7. पिवळ्या केळाच्या तुलनेत लाल हे केळ हे छोटं पण भरीव असतं. लाल केळात पिवळ्या केळापेक्षा क जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण जास्त असतं. शिवाय या केळाचा ग्लायसेमिक्स इंडेक्स ( हे केळ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर एकदम वाढत नाही) कमी असतो. म्हणूनच तज्ज्ञ देखील निरोगी आरोग्यासाठी लाल केळ खाण्याचा सल्ला देतात.

Image: Google

लाल केळ खावं पण किती?

लाल केळ त्यातील पोषक गुणधर्मांमुळे आरोग्यास फायदेशीर आहे. पण तरीही लाल केळी प्रमाणातच खायला हवीत. रोज 2 लाल केळी खाणं फायदेशीर ठरतं. त्यापेक्षा जास्त लल केळी खाल्ल्यात तर त्याचे दुष्परिणामही होतात. लाल केळात फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं ते जास्त खाण्यात आलं तर पोट बिघडतं. पोटात वेदना होतात. तसेच लाल केळात पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असल्यानं रक्तातील पोटॅशिअम वाढून हायपरक्लेमियासारखा आजार होवू शकतो. त्याचा परिणाम हदयाची गती अनियमित होते. लाल केळांच्या अति सेवनानं हाडं कमजोर होतात.

Images: Google

लाल केळ खायचं कसं?

1. लाल केळ आपल्या नेहमीच्या केळाप्रमाणे नुसतंच खाता येतं. तसेच हे केळ खूपच चविष्ट असल्यानं ते इतर फळांमधे मिसळून फ्रूट चाटसारखं खाता येतं.
2. पिकलेलं लाल केळ बारीक कापून ते ओट्समधे मिक्स करुन खाता येतं.
3. लाल केळाचा उपयोग केक आणि मफिन्स तयार करतानाही होतो. यामुळे केक आणि मफिन्सला विशिष्ट प्रकारचा स्वाद आणि पोषक घटक दोन्ही मिळतात.
लाल केळी  फळांच्या गाड्यावर मिळत नाही. ही केळी मोठ्या फळांच्या दुकानात किंवा केरळचे खाद्य पदार्थ मिळतात त्या दुकानात सहज मिळतात. 

Image: Google

लाल केळांचे चिप्स

 यासाठी 2 लाल कच्ची केळी आणि तळण्यासाठी तेल एवढीच सामग्री लागते.

 केळी हाताला कडक लागताय ना ते बघून घ्यावं. चिप्स साठी केळी मऊ असून चालत नाही. केळी सोलून त्याच्या मध्यम ( जाड नाही, पातळही नाही) जाडीच्या चकत्या कराव्यात. तेल तापवायला ठेवावं. केळाच्या चकत्या एक एक करुन तेलात सोडाव्यात. मध्यम आचेवर पाच ते सात मिनिटं सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. चकत्या कुरकुरीत लागायला लागल्या की तेलातून बाहेर काढाव्यात. संध्याकाळसाठी झटपट स्नॅक्स म्हणून लला केळांचे चिप्स खाता येतात. हे चिप्स तळायला तेलाऐवजी तूप घेतल्यास चिप्स आणखीनच चविष्ट लागतात.

Image: Google

कच्च्या लाल केळींचे काप

यासाठी 3 कच्ची लाल केळी, अर्धा कप मैदा, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 अंडं, पाव कप साखर, अर्धा चमचा मीठ, एक छोटा चमचा बेकिंग सोडा , 4 ब्रेडचा चुरा आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.

आधी कच्च्या लाल केळी सोलून घ्याव्यात. केळाचे दोन तुकडे करावेत. मग एक तुकडा घेऊन त्याचे मध्यम जाडीचे काप करावेत. एका भांड्यात अंडं फोडून ते नीट फेटून घ्यावं. नंतर त्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, सोडा आणि साखर घालून मिश्रण दाटसर आणि मऊ होईपर्यंत फेटावं. साधारण दहा मिनिटं लागतात. फेटलेल्या मिश्रणात एकही गुठळी राहायला नको. तेल तापवण्यास ठेवावं. ते तापेपर्यंत एका बाजूला केळीचे काप मिश्रणात बुडवून आणि ब्रेडमधे घोळून एका डिशमधे ठेवावेत. असे सर्व काप तयार करुन झाले की मग गरम तेलात तळण्यास सोडावेत. मध्यम आचेवर तळून घ्यावेत. हे काप तळण्यास पाच ते सात मिनिटं लागतात. चहासोबत किंवा तसेच खायलाही हे काप छान लागतात. 

Web Title: Red banana's food in Katrina Vicky's wedding; Why red banana is important for health, how to eat it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.