तिखट करण्यासाठी साधारण तेजा मिरची, लवंगी मिरची, बेडगी, कश्मिरी, गुंटूर, संकेश्वरी अशा मिरच्या वापरल्या जातात. अनेक घरांमध्ये संकेश्वरी किंवा गुंटूर मिरची वापरली जाते. कारण तिचा तिखटपणा मध्यम असतो. ज्या घरांमध्ये खूप जास्त तिखट खाल्लं जातं त्यांच्यासाठी तेजा मिरची आणि लवंगी किंवा कोल्हापुरी मिरची उत्तम असते. बेडगी किंवा काश्मिरी मिरचीचा तिखटपणा कमी असतो. पण तिखटाला छान रंग येण्यासाठी या दोन मिरच्यांचा वापर केला जातो. तिखट आणि कमी तिखट या दोन मिरच्या कॉम्बिनेशनमध्ये वापरून तिखट करण्याची पद्धत अधिक लोकप्रिय आहे..(Red Chili Powder Recipe)
कसं तयार करायचं तिखट?How to make Tikhat or Red chili powder?- घरच्याघरी तिखट तयार करणं अतिशय सोपं आहे. यासाठी सगळ्यात आधी बाजारात जाऊन तुमच्या घरी किती तिखट खाल्लं जातं त्यानुसार वरीलपैकी मिरच्यांची खरेदी करा.- मिरची घरी आणल्यानंतर ती एक दिवस कडक उन्हात पसरून ठेवा आणि वाळू द्या.- मिरच्या जर २- ३ दिवस उन्हात राहिल्या तर त्यांचा रंग फिका होत जातो. म्हणून एकच दिवस मिरच्या थेट सुर्यप्रकाशात वाळू द्या. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा एक कपडा पांघरूण टाका आणि अशा पद्धतीने मिरच्या आणखी १ दिवस कडक उन्हात वाळू द्या. यामुळे मिरच्यांना थेट ऊन लागून मिरच्यांचा रंग उतरणार नाही. - मिरची जेव्हा अगदी सहज हाताने तुटेल तेव्हा ती पुर्णपणे वाळली आहे असे समजावे. ही मिरची घरी मिक्सरमधून काढून बारीक करावी किंवा मग बाहेर कांडपमध्ये दळण्यास द्यावी.- काही ठिकाणी मिरचीची देठे आणि बिया तिखटासाठी वापरत नाहीत कारण तिखटाचा रंग यामुळे जरा फिका होतो.
तिखट खराब होऊ नये म्हणून कसं साठवायचं..(How to store red chilli properly?)- तिखट वर्षभर टिकावं तसेच त्यांचा रंग आणि तिखटपणा उडू नये यासाठी अनेक घरांमध्ये तिखटामध्ये मीठ, तेल आणि हिंग घालून ते साठवलं जातं.- यासाठी जर तुम्ही २ किलोचं तिखट केलं असेल तर त्यासाठी २०० ग्रॅम मीठ आणि २०० मिली तेल वापरावं.- तिखट जेव्हा दळून आणलं जातं तेव्हा ते एका परातीमध्ये टाका. दळल्या दळल्या तिखट गरम असतं. त्याचा गरमपणा पुर्णपणे ओसरला की मग त्यात मीठ टाका. मीठ आणि तिखट व्यवस्थितपणे एकत्र करा.
- त्यानंतर त्यामध्ये रुम टेम्परेचरवर असणारं तेल टाका. तेल गरम करू नका. तेल तिखटात व्यवस्थित एकत्र करा. तेल टाकल्याने तिखटात गुठळ्या तयार होतात. त्यामुळे त्या चमच्याने व्यवस्थित फोडून घ्या.- सगळं तिखट नंतर चाळणीने चाळून एका काचेच्या एअरटाईट बरणीत भरून ठेवा. तिखट भरल्यानंतर त्यावर हिंगाचे ३- ४ खडे ठेवा आणि बरणीचं झाकण पक्क लावून घ्या. कोरड्या जागेत ही बरणी ठेवल्यास तिखट वर्षभर खराब होणार नाही आणि त्याचा रंगही उतरणार नाही.