सँडविच अर्ध्या तासात बनून झटपट तयार होणाऱ्या सोप्या रेसिपीपैकी एक आहे. यात वापरल्या जाणाऱ्या घटकांची यादी खूपच लहान आणि घरात सहज उपलब्ध होते. सकाळी झटपट होणारा नाश्ता म्हणजे सँडविच. सँडविच म्हणजे काय तर भाज्या, चिरलेले चीज ,किंवा इतर कोणताही तुम्हाला आवडणारा पदार्थ ब्रेडच्या दोन्ही स्लाइस मध्ये ठेवून त्याला टोमॅटो सॉस किंचा चटणी लावून गरम करणे. खरंतर सँडविच हा बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ आहे. आणि ते जगभरात खूप प्रसिद्ध आहे. बरेच जण जेवण, नाश्ता म्हणून सँडविचलाच पसंती देतात.
सँडविचचे अनेक प्रकार आहेत. चीज सँडविच, व्हेजिटेबल सँडविच, व्हेज मेयोनीज सँडविच, चॉकलेट चीज सँडविच, टोमॅटो सँडविच इत्यादी प्रकारांमध्ये आपण सँडविच बनवू शकतो. धावपळीच्या जीवनशैलीत पटापट कामे उरकून नाश्ता करून ऑफिसला जाण्याची घाई असते. त्यामुळे आपण लवकरात लवकर होईल अशा नाश्त्याची तयारी करून ब्रेकफास्ट करून ऑफिसला जातो. आज प्रजासत्ताक दिनी घरच्या घरी तिरंगा सँडविच कसे बनवावे याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Republic Day Special Recipe : Tricolor Sandwiches).
साहित्य :-
१. सँडविच ब्रेड स्लाइस - ७ ते ८
२. हिरवी चटणी - २ टेबलस्पून
३. मेयॉनीज - १ टेबलस्पून
४. शेजवान सॉस - १ टेबलस्पून
५. काकडीच्या गोल चकत्या - ६ ते ७
६. कांद्याच्या गोल चकत्या - ६ ते ७
७. टोमॅटोच्या गोल चकत्या - ६ ते ७
८. चीज स्लाइस - ६ ते ७
९. चाट मसाला - चवीनुसार
१०. मीठ - चवीनुसार
i_got_hangryy या इंस्टाग्राम पेजवरून तिरंगा सँडविच कसे बनवायचे याचे साहित्य व कृती शेअर करण्यात आले आहे.
कृती :-
१. सर्वप्रथम एक ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी पसरवून घ्या.
२. आता त्यावर काकडीच्या गोल चकत्या पसरवून लावून घ्या. मग त्यावर चवीनुसार मीठ आणि चाट मसाला भुरभुरवून घ्यावा.
३. त्यावर परत एक ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर मेयॉनीज लावून घ्या.
४. मेयॉनीज लावून घेतल्यानंतर त्यावर कांद्याचे गोल काप पसरवून घ्यावे. त्यावर एक चीज स्लाइस ठेवा.
५. आता परत त्यावर एक ब्रेड स्लाइस ठेवा आणि त्याला शेजवान चटणी लावून घ्यावी.
६. शेजवान चटणी लावल्यानंतर त्यावर टोमॅटोचे गोल काप ठेवा. त्यावर परत एक ब्रेड स्लाइस ठेवा.
आपले तिरंगा सँडविच खाण्यासाठी तयार आहे, ते सँडविच आपण हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकतो.