Join us  

हॉटेलसारखा चटपटीत नूडल्स फ्रँकी रोल आता बनवा घरीच...ट्राय करा सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 3:43 PM

काहीतरी मस्त आणि चमचमीत बनवायचं असेल तर हा एक सोपा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. नूडल्स फ्रँकी रोल....

ठळक मुद्दे मुलांसाठी काहीतरी टेस्टी शिवाय तेवढंच हेल्दी बनवायचं असेल, तर नक्कीच नुडल्स फ्रॅंकी रोल ट्राय करून पहा.

आई गं.. काही तरी मस्त खायला दे ना, अशी मुलांची हाक आईला नेहमीच ऐकू येत असते. अनेकदा मुलांनी अशी फर्माईश केली की त्यांना कोणता पदार्थ खायला द्यावा, हे आईला कळतच नाही. कारण मुलांसाठी बनवायचाय म्हणजे तो पदार्थ चटपटीत आणि चमचमीतच हवा. शिवाय आईला नेहमी असणारी काळजी म्हणजे मुलांचं पोट यामुळे भरेल का? मुलांचे पोषण होईल का ??तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील आणि मुलांसाठी काहीतरी टेस्टी शिवाय तेवढंच हेल्दी बनवायचं असेल, तर नक्कीच नुडल्स फ्रॅंकी रोल हा एक चटपटीत पदार्थ ट्राय करून पहा. निश्चितच मुले खूश होऊन जातील. 

 

नूडल्स फ्रँकी रोलसाठी लागणारे साहित्यपाण्यात शिजवलेल्या नूडल्स, पत्ता कोबी, सिमला मिरची, गाजर, अद्रक- लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड किंवा ग्रीन चिली सॉस, चवीनुसार मीठ, कांदाच्या पात, ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स, मिरेपुड आणि रोल बनविण्यासाठी कणिक.

कसा करायचा नूडल्स फ्रँकी रोल?- सगळ्यात आधी तर दोन वाट्या कणिक घ्या. यामध्ये थोडे मीठ आणि एक टेबलस्पून तेल टाका आणि कणिक चांगली मळून घ्या. या कणकेमध्ये थोडे चिलीफ्लेक्स, ओरीगॅनो आणि मिरेपूड देखील टाकावी. कणिक मळून झाली की ती बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवून द्यावी. - एका कढईत एक टेबलस्पून तेल टाकावे. तेल थोडे तापले की, त्यामध्ये अद्रक- लसूण पेस्ट टाकावी. 

- यानंतर चिरलेल्या सगळ्या भाज्या कढईत टाकाव्या.- भाज्या अर्धवट वाफवून झाल्या की त्यामध्ये रेड चिली किंवा ग्रीन चिली आपल्याकडे जो उपलब्ध असेल तो सॉस टाकावा. यानंतर टोमॅटो सॉस आणि सोया सॉस देखील घालावा.- सॉसेस टाकून मिश्रण थोडेसे हलवून घ्यावे आणि त्यामध्ये आता शिजवलेल्या नूडल्स टाकाव्या. नूडल्स टाकल्यानंतर थोडे मीठ टाकावे आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. - आपल्या नूडल्स तर तयार झालेल्या आहेत. 

- आता पुरीसाठी घेतो त्यापेक्षा थोडी जास्त कणिक घ्या आणि त्याची पुरीपेक्षा मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्या. ही पोळी आता तव्यावर भाजून घ्या. पोळी भाजत आली की तव्यावर बटर सोडा आणि पोळीला सगळीकडून व्यवस्थित लागले जाईल, हे तपासा.- त्यानंतर आता पोळीच्या वरच्या बाजूवर मधोमध नूडल्स पसरवा. त्यानंतर पोळी दुमडून फ्रँकी तयार करा. 

- उलथण्याने दाबून पोळी आणि नूडल्स एकमेकांमध्ये घट्ट बसतील, असे करा आणि गरमागरम नूडल्स फ्रँकी सर्व्ह करा.  

टॅग्स :अन्नपाककृती