ब्रेड हा शक्यतो बहुतेक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी कधीतरी आणला जातो. याचबरोबर जर कधी ब्रेडचे काही खास पदार्थ तयार करायचे असतील तर खास ब्रेड विकत घ्यावा लागतोच. काहीवेळा आपण आपल्या गरजेनुसार ब्रेडचे छोटे पाकीट विकत घेतो. घरात जर जास्त माणसं असतील तर नाईलाजास्तव मोठे ब्रेडचे पाकिटच घ्यावे लागते. असे असले तरीही परंतु अनेकदा घरी आणलेल्या ब्रेडच्या पाकिटाचा एकाचवेळी पूर्ण उपयोग होत नाही. एकदा फोडलेले पाकीट पुन्हा वापरायची वेळ येते. मात्र अशावेळी ते ब्रेड शिळे झालेले असतात. त्याचे टोस्ट किंवा सँडविच बनवल्यानंतरही त्यांना म्हणावी तशी चव येत नाही. दरम्यान, प्रत्येक वेळी उरलेले ब्रेड आपण फेकून देतो. वारंवार असे केल्याने ब्रेड व पैसे दोन्ही वाया जातात(How to make stale bread fresh).
या उरलेल्या शिळ्या ब्रेडचे फेकून न देता नेमके काय करावे ? असा प्रश्न घरच्या गृहिणींपुढे कायम असतोच. प्रत्येकवेळी या उरलेल्या ब्रेड्सचे ब्रेड क्रंब्स बनवून ते स्टोअर केले जातात परंतु हे ब्रेड क्रंब्स देखील तसेच ठेवले तर काही वेळाने तेही खराब होण्याची शक्यता असते. तसेच शिळ्या ब्रेडचे काही इतर पदार्थ बनवायचे म्हटले की, ब्रेड शिळा असल्याने त्या पदार्थाना पाहिजे तशी चव येत नाही. अशावेळी हा शिळा ब्रेड एक झटपट सोपी ट्रिक वापरून पटकन खाण्यायोग्य फ्रेश बनवू शकतो. सुप्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी शिळा ब्रेड झटपट फ्रेश करण्यासाठीची एक सोपी ट्रिक त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर केली आहे(How to turn stale bread fresh again in less than 10 minutes).
शिळा ब्रेड स्लाइस पुन्हा फ्रेश करण्यासाठी सोपा उपाय...
१. एक भांड्यात थोडे पाणी घ्यावे. आता शिळा ब्रेड घेऊन त्यावर हे पाणी शिंपडावे. त्याचबरोबर आपण एखादा फूड ब्रश घेऊन तो पाण्यांत बुडवून घ्यावा. आता शिळा ब्रेड घेऊन या फूड ब्रशने किंचितसे पाणी शिळ्या ब्रेडच्या दोन्ही बाजूस लावून घ्यावे. त्यानंतर हे ब्रेड एका डिशमध्ये व्यवस्थित सपाट राहतील असे ठेवून घ्यावेत. आता मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये ही डिश ठेवून १५ सेकंदांसाठी हे शिळे ब्रेड गरम करून घ्यावेत. त्यानंतर हे ब्रेड बाहेर काढून घ्यावेत. आता हे ब्रेड पुन्हा पाहिल्यासारखे फ्रेश व खाण्यायोग्य होतील. आपण ब्रेडला हात लावून पहिले तर हे आधीसारखे हाताला सॉफ्ट लागतील. अशाप्रकारे आपले फोडलेल्या ब्रेडच्या पाकिटातले शिळे ब्रेड दुसऱ्या दिवशीही खाण्यासाठी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी फ्रेश असतील.
२. जर आपल्याकडे मायक्रोव्हेव ओव्हन नसेल तर आपण पॅनचा वापर करून देखील हे शिळे ब्रेड स्लाइस पुन्हा फ्रेश करु शकता. एक पॅन घेऊन त्यावर झाकण ठेवून तो गॅसच्या मंद आचेवर ठेवून हलका गरम करुन घ्यावा. आता पॅनचे झाकण उघडून त्यात हे शिळे ब्रेड स्लाइस ठेवून त्या ब्रेड स्लाईसच्या बाजूला चमचाभर पाणी ओतावे आणि लगेच पॅनवर झाकण ठेवून द्यावे. आता ५ मिनिटांनी हे पॅनमधील ब्रेड स्लाइस काढून घ्यावेत. शिळे ब्रेड स्लाइस अगदी ताजे फ्रेश होतील.
३. एका मोठ्या डिशमध्ये ब्रेड स्लाइस ठेवून त्याच डिशमध्ये बाजूला पाण्याने अर्धी भरलेली वाटी ठेवून द्यावी. आता ही डिश आहे तशीच मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये १० मिनिटांसाठी ठेवून द्यावी. त्यानंतर ही डिश मायक्रोव्हेव ओव्हन मधून काढून घ्यावी. या सोप्या ट्रिकमुळे शिळे झालेले ब्रेड लगेच फ्रेश होण्यास मदत मिळेल.