Join us  

ललिता पंचमी : १ वाटी तांदळाची करा पातेलंभर खीर, देवीचा नैवेद्य होईल चविष्ट-सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 11:05 AM

Rice tandul kheer for lalita panchami navratra special recipe : कुमारीका आवडीने खातील तांदळाची खीर, होतील तृप्त..

नवरात्रीत प्रत्येक दिवसालाच विशेष महत्त्व असते. त्यातही पंचमी, अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व असते. ज्यांच्याकडे घट बसतात त्यांच्याकडे तर हे दिवस आवर्जून साजरे केले जातात. पंचमीला कुमारीकांची पूजा, अष्टमी आणि नवमीला सवाष्ण महिलांची ओटी भरणे याला विशेष महत्त्व असते. या दिवशी आपल्या घरी कुमारीका किंवा सवाष्णी यांच्या रुपाने देवी येते असे मानले जाते (Rice tandul kheer for lalita panchami navratra special recipe). 

ललिता पंचमीला कुमारीकांचे पूजन म्हणजे त्यांच्या पायावर स्वस्तिक काढून त्यांना ओवाळले जाते. त्यांना नमस्कार करुन काही भेटवस्तू देऊन गोडाधोडाचे जेवण केले जाते. साधारणपणे या दिवशी तांदळाची खीर, लाल भोपळ्याचे घारगे, भाजणीचे वडे यांचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. तांदळाची खीर आपण एरवी करतोच असे नाही. पण या निमित्ताने तरी ही खीर केली जाते. ही खीर छान दाटसर आणि चविष्ट झाली तर सगळेच ती आवडीने खातात. त्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

(Image : Google)

१. तांदूळ चांगला खरपूस भाजून घ्या. (आपल्या आवडीचा चांगला वास येणारा आंबेमोहोर, बासमती असा कोणताही तांदूळ तुम्ही या खिरीसाठी घेऊ शकता.)

२. त्यानंतर भाजलेला तांदूळ थोडा गार होण्यासाठी ताटलीमध्ये पसरुन ठेवा. 

३. मग हा तांदूळ मिक्सरमधून थोडा ओबडधोबड वाटून घ्या. 

४. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात २ ते ३ चमचे तूप घालून हे बारीक केलेले तांदूळ पुन्हा थोडे गरम होईपर्यंत परता. मग अंदाजे १ ते दिड ग्लास पाणी घाला. 

५. दुसरीकडे साधारण अर्धा लिटर दूध तापवून घ्या आणि याच दुधात साखर, वेलची पूड आणि केशर घाला.

६.  तांदूळ थोडा शिजत आला असे वाटले की दुधाचे हे मिश्रण तांदळामध्ये घाला आणि परत चांगले शिजवून घ्या. 

७. खीरीला चांगली उकळी येईपर्यंत ती एकसारखी हलवत राहायची म्हणजे खाली लागत नाही. 

८. आवडीप्रमाणे खीरीमध्ये बेदाणे, पिस्ता-काजू-बदामाचे काप घालायचे.खीर छान एकजीव होईपर्यंत हलवत राहायचे. 

९. दूध आणि खीर चांगली घट्टसर व्हायला लागली असे वाटले की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचे.

१०. ही खीर गरम खाणार असाल तर यामध्ये वाढताना गरजेनुसार कोमट दूध घातले तरी चालते. गार खायची असल्यास घट्ट खीरही फार छान लागते.   

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४अन्नपाककृतीनवरात्रीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.