फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून दिवसातून एक किंवा दोन फळं खायलाच हवीत असं आपण नेहमी म्हणतो. लहान मुलांना तर आपण आवर्जून फळं देतोही. फळांमध्येही सर्व प्रकारची, आंबट, गोड, तुरट अशा सर्व चवीची फळं खायला हवीत असं आपण म्हणतो. फळं खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे असून फळांतून आपल्याला मिळत असलेल्या घटकांमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला फायबर, खनिजे, व्हिटॅमिन्स मिळतात. हे सगळं जरी ठिक असलं तरी फळं कोणत्या पद्धतीनं खाल्ल्यावर आपल्याला त्यातून जास्त प्रमाणात पोषण मिळते हे मात्र आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपण फळं चुकीच्या पद्धतीने फळं खात असू तर आपल्याला त्यातून म्हणावे तितके पोषण मिळत नाही. तर फळं खाण्याची योग्य पद्धत कोणती ज्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात पोषक घटक मिळण्यास मदत होईल ते पाहूया (Right Way of Eating Fruits)...
१. ताजी फळं खावीत
आपण अनेकदा बाजारातून एकदम फळं आणि भाजीपाला आणतो आणि तो फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. फ्रिजमध्ये फळं किंवा भाजीपाला चांगला टिकत असला तरी त्याचे पोषणमूल्य कमी होते. फळ नैसर्गिकरित्या जितके ताजे असेल तितके त्यातून जास्त पोषण मिळते. मात्र हेच फळ जुने झाले की त्यातील पोषण कमी होत जाते. आधीच शेतातून किंवा झाडावरुन आपल्यापर्यंत फळं येण्यासाठी बराच कालावधी गेलेला असतो. त्यात आपण आणखी जास्त काळ हे फळ ठेवून खाल्ले तर ते आणखी जुने होते आणि त्यातील कोषक घटक कमी होतात. म्हणून कायम ताजी फळे खायला हवीत.
२. आंबट फळं खावीत
संत्री, मोसंबी, अननस, स्ट्रॉबेरी, आवळा यांसारखी आंबट चवीची फळं आवर्जून आपल्या आहारात असायला हवीत. आंबट फळांमध्ये सी व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते. सी व्हिटॅमिन शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि विविध आजारांचा सामना करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे गोड फळं चवीला चांगली लागत असली तरी आंबट फळंही खायला हवीत.
३. सालांसकट फळं खावीत
केळं, कलिंगड, पपई, मोसंबी यांसारख्या फळांची साले आपण खाऊ शकत नाही. मात्र चिकू, सफरचंद, द्राक्षे, पेरु यांसारखी फळे सालांसकट खायला हवीत. फळांच्या सालांमध्ये फळांइतकेच पोषक घटक असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असतात. अनेकांना सगळ्याच प्रकारच्या फळांची साले काढण्याची सवय असते. मात्र असे करणे आपल्या तोट्याचे ठरु शकते. फळांची साले आपण फेकून देतो, त्यामुळे त्यातले पोषक घटक वाया जातात. त्यापेक्षा ते पोटात गेल्यास आपल्याला फायदा होत असल्याने फळं सालासकट खायला हवीत.