आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आहारात फळं, भाज्या, सलाड, दूध, डाळी, कडधान्ये या सगळ्याचा समावेश असायला हवा हे आपल्याला माहित असते. त्यानुसार तब्येत चांगली राहण्यासाठी आपण अनेकदा समतोल आहार घेतो. यामध्ये आपण आवर्जून फळांचाही समावेश करतो. लहान मुले किंवा आजारी आणि वयस्कर व्यक्ती यांनीही नियमीत फळे खायला हवीत असे सांगितले जाते. त्यामुळे फळांच्या किंमती वाढल्या तरी आपण आवर्जून फळं खरेदी करतो. विशिष्ट सिझनमध्ये येणारी फळं खायला हवीत हे माहित असल्याने आपण ती फळे खातोही. पण ही फळे खाताना आपण काही चुका करतो. ज्यामुळे फळांमधून मिळणारे पोषण आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही (Right ways to eating Fruits). आता अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे फळांतून मिळणारे पोषण आपल्याला मिळत नाही. या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करुया आणि तब्येत जास्तीत जास्त चांगली राहण्यासाठी प्रयत्न करुया .
१. फळांच्या साली काढणे
अनेकदा आपण फळे खाताना त्याच्या साली काढून फळ खातो. यामध्ये सफरचंद, चिकू यांसारख्या फळांचा समावेश असतो. पण असे करणे आरोग्यासाठी उपयुक्त नाही. फळांच्या सालींमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांचे प्रमाण भरपूर असते. साले काढल्याने त्याचे पोषण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळे सालीसकट खायला हवीत.
२. फार ठेवलेली फळे उपयोगी नाहीत
आपण बाजारातून एकदाच भरपूर फळे आणतो आणि ती फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. पण फळ जुने झाले की त्यातील पोषणमूल्ये कमी होत जातात. त्यामुळे फळे शक्यतो ताजी खायला हवीत. आपण शहरी भागात राहत असल्याने आधीच झाडावरुन फळ आपल्यापर्यंत यायला बराच वेळ गेलेला असतो. पण त्याच्या पुढे आपण ते जास्त ठेवून खाल्ले तर आरोग्यासाठी ते चांगले नसते.
३. आंबट फळे खायला हवीत
द्राक्षे, संत्री, मोसंबी, अननस यांसारखी आंबट फळे आवर्जून खायला हवीत. आंबट फळांमध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण चांगले असते. व्हिटॅमीन सी मुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अनेकदा आपण आंबटपणामुळे आंबट फळे खायचा कंटाळा करतो किंवा ती टाळतो पण तसे करणे फायद्याचे नाही. तसेच या फळांचा शरीराला उपयोग व्हावा असे वाटत असेल तर आंबट फळे चहा, कॉफी किंवा इतरे पेयांसोबत खाणे टाळावे.