आपण दुपारी कितीही पोटभर जेवलो असलो तरीही आपल्याला संध्याकाळी चहाच्या वेळी छोटी भूक लागतेच. चहाच्यावेळी लागणाऱ्या अशा छोट्या भुकेसाठी आपण काहीच खाल्ले नाही तर ही छोटी भूक आपल्याला वारंवार सतावते. अशा छोट्या भुकेसाठी आपण वेफर्स, बिस्कीट असे पॅकेजिंग केलेले पदार्थ खातो. परंतु असे पॅकेजिंग केलेलं पदार्थ वारंवार खाणे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकतात. यासाठी चहाच्यावेळी लागणाऱ्या अशा छोट्या भुकेच्यावेळी आपण ड्रायफ्रुट्स, फळ, चणे - शेंगदाणे, घरगुती चिवडा असे पौष्टिक पदार्थ देखील खाऊ शकतो.
सध्या सगळेच आपल्या हेल्थ बाबतीत खूपच सजग झाले आहेत. त्यामुळे आपल्यापैकी बरेचसे लोक चहाच्यावेळी लागणाऱ्या छोट्या भुकेच्यावेळी वेफर्स, बिस्किट्स, कचोरी, फरसाण असे तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळतात. मग या संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी नेमकं खायचं तरी काय असा प्रश्न पडतो? काहीच खाल्ले नाही तर भुकेने जीव कासावीस होतो. अशावेळी आपण घरगुती हेल्दी पोहे, कुरमुरे, मखाण्यांचा पौष्टिक चिवडा खाऊ शकतो. हा चिवडा घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट बनवून होतो. हा हलका - फुलका पौष्टिक चिवडा खाल्ल्याने भूकही भागेल व बाहेरचे तेलकट, मसालेदार पॅकेजिंग फूड खाण्याचा प्रश्नच येणार नाही(Roasted Makahan, Poha Chivda Recipe).
साहित्य :-
१. कुरमुरे - १ बाऊल
२. पोहे - १ बाऊल
३. मखाणे - १ बाऊल
४. तेल - २ ते ३ टेबलस्पून
५. मोहरी - १ टेबलस्पून
६. शेंगदाणे - १/२ कप
७. काजू - १/४ कप
८. मनुका - १/२ कप
९. बदाम - १/२ कप
१०. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (उभ्या चिरुन घेतलेल्या)
११. कढीपत्ता - ६ ते ८ पानं
१२. हळद - १ टेबलस्पून
१३. हिंग - १ टेबलस्पून
१४. मीठ - चवीनुसार
मसाला बनविण्यासाठीचे साहित्य :-
१. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
२. जिरे पावडर - १ टेबलस्पून
३. धणे पावडर - १ टेबलस्पून
४. चाट मसाला - १/२ टेबलस्पून
५. साखर - १ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम मसाला बनविण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मसाला बनविण्यासाठीचे सगळे साहित्य एकत्रित करुन घ्यावे.
२. आता एका पॅनमध्ये पोहे, कुरमुरे, मखाणे हे तिन्ही जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत.
३. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन ते व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात मोहरी, शेंगदाणे, काजू, बदाम, मनुके घालून ते किमान ३ मिनिटे परतून घ्यावेत.
४. आता त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद घालून सगळे जिन्नस तेलात नीट परतून घ्यावेत.
५. या तयार झालेल्या मिश्रणांत आता कोरडे भाजून घेतलेले मखाणे, पोहे, कुरमुरे घालावेत. त्यानंतर यात तयार करून घेतलेले मसाले सगळीकडे भुरभुरवून घ्यावे. सगळ्यांत शेवटी चवीनुसार मीठ घालावे.
६. आता चमच्याच्या मदतीने हा तयार झालेला चिवडा व्यवस्थित एकजीव करुन घ्यावा.
आपला कुरकुरीत टी - टाइम स्नॅक म्हणून खाण्यासाठी पौष्टिक चिवडा तयार आहे. गरमागरम चहा सोबत हा चिवडा खाण्यासाठी सर्व्ह करावा. हा चिवडा एका हवाबंद बरणीत भरुन ठेवल्यास किमान २ ते ३ महिने चांगला टिकतो.