सणासुदीला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करणं ही जगभरातल्या लोकांसाठी, त्यातही बायकांसाठी मोठीच डोकेदुखी असते. म्हणजे आपल्या घरी पाहुणे यायला हवे असतात. ते आपणच प्रेमानं बोलावलेले असतात. ते आपलेच जवळचे मित्र किंवा नातेवाईक असतात. त्यांना बोलावून त्यांना छान जेवायला घालण्याची आपल्याला इच्छा असते; पण तरीही, बारा- पंधरा- वीस माणसांचा स्वयंपाक करणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी दोन- तीन दिवस आधीपासून तयारी करावी लागते. काही खरेदी करावी लागते. काही पूर्वतयारी करावी लागते. ऐनवेळी बरंच काम करावं लागतं आणि मग नेमके पाहुणे आलेले असताना, भरपूर गप्पा मारायच्या वेळी आपण मात्र सॉलिड दमून गेलेले असतो. अशा वेळी प्रत्येक यजमानाच्या मनात एकच विचार येतो की, हा सगळा स्वयंपाक करणारा एखादा रोबो कोणी बनवून दिला तर?
(Image : Google)
आताआतापर्यंत स्वयंपाक करणारा रोबो ही एक कविकल्पना होती; पण आता मात्र अनेक कंपन्या ती प्रत्यक्षात आणतायत. लंडनच्या मॉली रोबोटिक्सचं मॉली रोबोटिक किचन ऑलमोस्ट तयार आहे. इतकं, की ते पुढच्या वर्षी बाजारात येईल. हा रोबो नेमकं काय करतो? तर तो वेगवेगळ्या प्रकारचे ५००० पदार्थ तयार करू शकतो. पदार्थ किती माणसांसाठी पाहिजे आहे, तो टच स्क्रीनवर सिलेक्ट करायचा की, यासाठी लागणारे जिन्नस कुठले ते तो सांगतो. त्या पदार्थांसाठीचे कच्चे जिन्नस रोबोनं सांगितलेल्या जागी भरायचे आणि मग आपण निवांत बसायचं. रोबोटिक किचनमध्ये पदार्थ आपोआप तयार होतो.
रोबोटिक किचनची ही यंत्रणा स्वयंपाकघराच्या छताला फिट केली जाते. त्यातील रोबोटिक आर्म्स तिथे फिट केलेल्या रेलिंग्जवरून सगळी हालचाल करतात. या रोबोला भांडी उचलता आणि ठेवता येतात. ओव्हन चालू आणि बंद करता येतो. पदार्थ ढवळता येतो आणि उलटता येतो.
हा रोबो तयार करण्यासाठी मॉली रोबोटिक्सने टीम अँडरसन या २०११ च्या बीबीसी मास्टरशेफ विनर शेफची मदत घेतली. टीम म्हणतो की, साधारण रोबोचा लेआउट जसा असणार होता तशा जागेत मी पदार्थ बनवायचो. माझ्या हालचाली ट्रॅक केल्या जायच्या. त्या हालचाली रोबोच्या प्रोग्रॅमला फीड केल्या जायच्या. मग त्या हालचाली रोबोला करता येतील अशा सोप्या करून रोबोसाठी फायनल केल्या जायच्या. असं करत करत हा रोबो डेव्हलप झालेला आहे. त्यात त्या रोबोनं चुकून माणसांना इजा करू नये यासाठी पुरेशी खबरदारीही घेतलेली आहे. असे अजूनही काही रोबोज इतर कंपन्यांनी डिझाइन केले आहेत. उदा. इस्रायलचे किचन रोबोटिक्स आणि यूएसएचे डेक्सई रोबोटिक्स.
हे सगळेच रोबोज घरगुती किचन किंवा व्यावसायिक किचन या दोन्हीचं काम करू शकतात; पण अर्थात आता हे रोबो लोकांच्या उपयोगी येण्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्या रोबोच्या किमती! मॉली रोबोटिक किचनची आजची किंमत आहे तब्बल दीड लाख पाउंड! अर्थात, अशी सगळीच गॅझेट्स जेव्हा पहिल्यांदा बाजारात येतात तेव्हा त्यांच्या किमती सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेरच असतात; पण हळूहळू त्या किमती उतरतात; पण रोबोटिक किचनची किंमत जास्त असली तरीही ते प्रत्यक्षात आणायला सुरुवात झालेली आहे.
रोबोटिक्सच्या दोन विद्यार्थ्यांनी पिझ्झा बनवणारा रोबो तयार केला आणि मग तो रोबो वापरून त्यांनी २०१९ साली पिझ्झा बनवणाऱ्या रेस्टॉरंटची पाझ्झी नावाची छोटी चेन उघडली. त्यांचं पहिलं रेस्टॉरंट त्यांनी पॅरिसमध्ये उघडलं आणि दुसरं ब्रसेल्समध्ये. त्यांचा रोबो सुमारे ५ मिनिटांत एक पिझ्झा बनवतो. त्यात तो स्वत:च कणीक घेतो, त्यावर सॉस घालतो, तो ओव्हनमध्ये टाकतो. त्यावर सांगितलेली टॉपिंग्ज घालतो. मग पिझ्झा कट करतो आणि घेऊन जाण्याच्या खोक्यात भरतो. आता त्यांच्याकडे या पिझ्झा बनवणाऱ्या मशीनच्या १००० हून जास्त इन्क्वायरीज आहेत. त्यातल्या बव्हंशी इन्क्वायरीज इटलीमधून आलेल्या आहेत; पण जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेतूनही लोकांनी त्याची चौकशी केली आहे.
जगातल्या सगळ्याच क्षेत्रांत होतो तसा ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा शिरकाव हॉटेल इंडस्ट्रीमध्येही होताना दिसतो आहे. रोबोजमुळं स्वच्छता राखणं आणि दर्जा कायम ठेवणं अधिक सोपं होईल, यात काही शंका नाही; पण म्हणून रोबोज या प्रोफेशनल शेफना संपूर्णपणे रिप्लेस करतील का?
- बर्कशायरमध्ये एक फाइन डाइन रेस्टॉरंटस्ची चेन चालवणाऱ्या वेस्ले स्मॉली यांना तसं वाटत नाही. ते म्हणतात की रोबोजमुळं काम सोपं झालं, अधिक नेटकं झालं तरीही ते माणसाला पूर्णपणे काढून टाकू शकतील, असं वाटत नाही. कारण किती झालं तरी शेफ हा माणूस असतो आणि क्रिएटिव्ह असतो.
रोबोटिक आर्मच्या ‘हाताची चव’ कशी असेल?
स्वयंपाक करणे ही अखेर कला आहे, त्यातली उत्स्फूर्तता रोबोला कशी जमेल? त्यामुळं काही प्रमाणात या इंडस्ट्रीमध्ये रोबोचा शिरकाव होईल; पण त्यामुळं सगळंच बदलून जाईल असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटत नाही. कारण किती झालं तरी रोबोच्या रोबोटिक आर्मला माणसाच्या ‘हाताची चव’ कशी येणार?