Join us  

उन्हाळ्यात पोळ्या लवकर कडक-वातड होतात? पोळ्या मऊसूत राहण्यासाठी ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2022 11:15 AM

जेवताना पोळीचा घास तोडला आणि पोळी मऊ, लुसलुशीत असेल तर आपण मनापासून आणि थोडे जास्तच जेवतो. पण हीच पोळी वातड किंवा कडक झाली की मात्र सगळा मूडच जातो, असे होऊ नये म्हणून...

ठळक मुद्देपोळी लाटताना थोडी जाडसर लाटावी. त्यामुळे पोळी जास्त वेळ मऊ राहते. उन्हाळ्यात पोळ्या कडक आणि वातड होऊ नयेत म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात...

गहू हे प्रामुख्याने महाराष्ट्रात वापरले जाणारे महत्त्वाचे धान्य. आपल्या रोजच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पोळी. महाराष्ट्रात बहुतांश घरात किमान दुपारच्या जेवणासाठी आणि अनेकांकडे दोन्ही वेळच्या जेवणासाठी पोळी केली जाते. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ यांची भाकरी हे पोळीला पर्याय असतात. पण त्यापेक्षा आपण पोळीच खाणे पसंत करतो. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असल्याने आपल्याला जीव नकोसा झालेला असतो. सतत पाणी प्यावेसे वाटते आणि गार काहीतरी खावेसे वाटते. पाण्यानेच पोट इतके भरते की जेवायची इच्छाच राहत नाही. उन्हामुळे एकूणच मरगळ आलेली असल्याने पोळी-भाजी खायची तर अजिबातच इच्छा होत नाही. त्यातच उन्हामुळे सकाळी केलेल्या पोळ्या दुपारपर्यंत कडक किंवा वातड झाल्या तर जेवणाची इच्छाच मरते. अशावेळी शरीराचे योग्य ते पोषण होत नाही आणि आपल्याला लवकर थकल्यासारखे गळून गेल्यासारखे होते. मात्र आमरसाचे जेवण असेल तर आपण दणकून पोळ्या खातो. पण या पोळ्या मऊ- लुसलुशीत राहाव्यात यासाठी काय करायचे याविषयी समजून घेऊया....

१. कापडाचा वापर 

उन्हामुळे पोळ्या डब्यात ठेवल्यावर वातड होत असतील तर पोळ्या झाल्यावर त्या डब्यात ठेवताना डब्यात खाली पातळ सुती कापड घाला. म्हणजे पोळ्यांमधील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होईल. यामुळे पोळ्या दुपारी आणि अगदी संध्याकाळपर्यंत नरम राहण्यास मदत होईल आणि जेवताना चिडचिड होणार नाही. 

२. तेलाचा किंवा तुपाचा वापर

उन्हाळ्यात आपल्यालाही ज्याप्रमाणे गळून गेल्यासारखे होते, त्याचप्रमाणे उन्हाच्या तडाख्यामुळे पोळ्याही मऊसूत राहत नाहीत. अशावेळी कणीक मळताना नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घालावे. तसेच पोळ्या झाल्यावर त्यावरुनही पोळ्यांना बोटाने तेल किंवा तूप आवर्जून लावावे. म्हणजे पोळ्या लुसलुशीत राहतात.

३. कणीक मळताना लक्षात ठेवा

कणीक मळताना ती थोडी सैलसर मळावी. जेणेकरुन पोळी छान लाटली जाते. कणीक घट्ट भिजवली तर पोळ्या लवकर वातड होतात. तसेच कणीक जास्त वेळ मळावी. आपल्या हाताची उर्जा त्यामध्ये गेल्याने ती एकसारखी मळली दाते आणि पोळ्या मऊ होतात. कणीक मळल्यानंतर ती १० ते १५ मिनीटे झाकून तशीच ठेवावी आणि नंतर पोळ्या कराव्यात. त्यामुळे कणकेतील ग्लुटेन हा पदार्थ एकजीव होतो आणि पोळी मऊ होते. त्यामुळे पोळ्या करताना कणीक मळण्याचे तंत्र व्यवस्थित असल्यास पोळी कडक किंवा वातड होत नाही. 

४. लाटताना काळजी घ्या

पोळी एकसारखी लाटली जात नसेल तरीही ती कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोळी सगळ्या बाजूने एकसारखी लाटली जात आहे ना हे बघावे. पोळीचा मध्यभाग आणि कडा एकसारख्या लाटल्या जायला हव्या. पातळ पोळ्या लवकर कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोळी लाटताना थोडी जाडसर लाटावी. त्यामुळे पोळी जास्त वेळ मऊ राहते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.