Join us  

साबुदाण्याची भेळ, साबुदाणा भजी करा खमंग! उपवासाला उत्तम आणि पावसातही चमचमीत खा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 1:56 PM

साबुदाण्याची भजी, साबुदाण्याची भेळ, भगरीची खीर आणि उपवासाचा दही बटाटा हे पदार्थ एरवीच्या उपवासालाही नेहेमीच्या उपवासांच्या पदार्थांना चांगले पर्याय ठरतील. आषाढीला चटपटीत आणि पौष्टिक करणारे हे पदार्थ नक्की करुन पाहा!

ठळक मुद्दे साबुदाण्याची भजी खास उपवासाचीच आहेत.आषाढीला संध्याकाळी काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर साबुदाण्याची भेळ हा उत्तम पर्याय आहे.उपवासाला भगर किंवा थालिपिठ केलं की त्यासोबत खायला काहीतरी पातळ पदार्थ हवा, त्यासाठी चटपटीत दही बटाटा करा.छायाचित्रं- गुगल

आषाढी एकादशीला साबुदाणा खिचडी, भगर-आमटी, उपवासाचे थालिपीठ , गोड/तिखट रताळे, राजगिरा/शिंगाडा शिरा असे विविध पदार्थ केले जातात. पण यंदाच्या आषाढीला स्पेशल करण्यासाठी हटके पदार्थ करुन पाहायला काय हरकत आहे. अर्थात ते तयार करण्यासाठी खूप काही वेगळी सामग्री लागणार नाही. पण उपवासाच्या वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आनंद मात्र नक्की घेता येईल. साबुदाण्याची भजी, साबुदाण्याची भेळ, भगरीची खीर आणि उपवासाचा दही बटाटा हे पदार्थ एरवीच्या उपवासालाही नेहेमीच्या उपवासांच्या पदार्थांना चांगले पर्याय ठरतील. आषाढीला चटपटीत आणि पौष्टिक करणारे हे पदार्थ नक्की करुन पाहा!

(छायाचित्र- गुगल)

साबुदाण्याची भजी

भजी म्हटली की तोंडाला पाणी सुटतं. उपवासाला भजी खाण्याची इच्छा झाली तरी खाता येत नाही. पण ही साबुदाण्याची भजी खास उपवासाचीच आहेत. यासाठी एक वाटी साबुदाणा, दोन ते तीन उकडलेले बटाटे, दोन चमचे शेंगदाणे खरपूस भाजलेले, अर्धी वाटी कुट्टुचं पीठ, कोथिंबीर आणि तळणासाठी तेलसाबुदाण्याची भजी करताना आधी साबुदाणा चांगला धुवून दोन ते तीन तास भिजवावा. भिजवलेल्या साबुदाण्यात खरपूस भाजलेले शेंगदाणे ओबड धोबड कुटून घालावेत, जिरे, हिरव्या मिरच्या वाटल्यास थोडं आलं वाटून ती पेस्ट घालावी. किंवा मिरच्या बारीक तुकडे करुन घातल्यास भजी खमंग आणि झणझणीतही लागतात. नंतर यात उकडलेले बटाटे हाताने कुस्करावेत.फार बारीक करु नये. कुट्टुचं पीठ, मीठ, लिंबाचा रस, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व साहित्य नीट एकत्र गोळा करुन घ्यावं. किंवा ते नीट एकत्र करुन चमच्याने तेलात सोडूनही भजी करता येतात. मिश्रणाचे हातावर गोल गोळे करुन किंवा चमच्याने मिश्रण तेलात टाकून मध्यम आचेवर भजी लालसर तळून घ्यावीत. कोथिंबीर ओलं खोबरं यांच्या गोड आंबट चटणीसोबत ही भजी छान लागतात.

 (छायाचित्र- गुगल)

 

साबुदाण्याची भेळ

आषाढीला संध्याकाळी काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर साबुदाण्याची भेळ हा उत्तम पर्याय आहे.यासाठी अर्धा कप साबुदाणा, एक बटाटा, एक चमचा शेंगदाणे, सात-आठ काजू, लिंबाचा रस, लाल तिखट, तेल आणि सैंधव मीठ इतकंच साहित्य लागतं.आधी साबुदाणा धुवून दोन तीन तास भिजत घालावा. साबुदाणा भिजला की तेल गरम करावं. त्यावर बटाट्याचे तुकडे लालसर परतून घ्यावेत. ते बाजूला काढून ठेवावेत. मग शेंगदाणे आणि काजू लालसर परतून बाजूला काढून ठेवावेत. कढईत थोडं तेल घालून त्यावर भिजलेला साबुदाणा घालावा. तो मऊ होण्याइतपत परतून घ्यावा. नंतर त्यात परतलेले बटाटे, शेंगदाणे, काजू लाल तिखट आणि सैंधव घालून ते पुन्हा एक मिनिटभर परतून घ्यावेत. मग गॅस बंद करुन लिंबाचा रस घालावा. वाटल्यास या भेळीत डाळिंबाचे दाणे, थोडा बटाट्याचा चिवडाही टाकता येतो. आवडत असल्यास यात साखर घालावी. नाही घातली तरी साबुदाणा भेळ छान चटपटीत लागते.

(छायाचित्र- गुगल)

उपवासाचा दही बटाटा

उपवासाला भगर किंवा थालिपिठ केलं की त्यासोबत खायला काहीतरी पातळ पदार्थ हवा. शेंगदाण्याची आमटी ही नेहेमीची झाली. यंदा भगर, थालिपिठ, राजगिरा पुरी यांच्यासोबत दही बटाटा ही चटपटीत भाजी करुन पहा.दही बटाटा करण्यासाठी दोन बटाटे, एक कप दही, पाणी, जिरे, लाल तिखट, आलं, पाव चमचा सूंठ पावडर ,सैंधव मीठ आणि तूप किंवा तेल ही सामग्री लागते.बटाटे उकडून घ्यावेत. ते हाताने कुस्करावेत. फार बारीक करु नये. दही फेटून घ्यावं. तेल/तूप गरम करावं. त्यात जिरे टाकावेत. ते तडतडले की किसलेलं आलं, लाल तिखट, सूंठ पावडर टाकावी. कुस्करलेला बटाटा टाकून तो चांगला मिसळून घ्यावा.मग त्यात फेटलेलं दही घालावं. ते चांगलं एकत्र केलं की त्यात गरम केलेलं पाणी घालावं. रस्सा दाटसर होईपर्यंत भाजी उकळू द्यावी नंतर त्यात सैंधव मीठ घालून गॅस बंद करावा. वरुन कोथिंबिर घालावी. ही भाजी गरम गरम खावी.

(छायाचित्र- गुगल)

 

भगरीची खीर

भगर खाणं हे खूप पौष्टिक मानलं जातं. भगर म्हणजे मिलेट आहे. ती ग्लुटेन फ्री असून तिच्यात फायबर भरपूर प्रमाणात आहे. प्रथिनांचं प्रमाणही जास्त असल्याने ती पौष्टिक असते. शिवाय पचण्यास हलकी. या भगरीची मस्त खीर करता येते. ती नैवेद्याला वेगळा गोड पदार्थ म्हणून उत्तम आहे.भगरीची खीर करण्यासाठी पाव कप भगर, तीन कप सायीचं दूध, दहा ते बारा काजू, एक चमचा बेदाणे, चवीनुसार साखर, वेलची-जायफळ पूड, केशर काड्या हे साहित्य लागतं.खीर करताना आधी भगर धुवून एक तास पाण्यात भिजवावी. ती भिजली की दूध गरम करावं. मध्यम आचेवर दुधाला उकळी फुटली की मग त्यात भगर पाणी निथळून घालावी. ती चांगली हलवून त्यावर झाकण ठेवावं. मधून मधून मिश्रण ढवळत रहावं. भगर दुधात शिजायला पंधरा -वीस मिनिटं लागतात. नंतर त्यात चवीनुसार साखर टाकावी. साखर विरघळली की काजू, बेदाणे घालावेत. हे जिन्नस घातलं की मिनिटभर खीर उकळू द्यावी. मग गॅस बंद करुन वेलची-जायफळ पूड घाकावी. केशरकाड्या घालाव्यात. ही दाटसर खीर बासुंदीसारखी लागते. ती गरम असतांनाच खावी.