उपवासाच्या दिवशी किंवा एरवीही आपल्याला कुरकुरीत छान काहीतरी खावसं वाटतं. अशावेळी विकतचे चिप्स किंवा आणखी काही खाण्यापेक्षा घरात केलेले काही तळून घेतले तर आपली इच्छाही पूर्ण होते आणि आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत कडक ऊन असल्याने गॅलरीत किंवा अगदी खिडकीतून येणाऱ्या उन्हातही आपण वाळवणं करु शकतो. साबुदाणा हा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा प्रकार. याच साबुदाण्याच्या अगदी झटपट आणि भरपूर फुलणाऱ्या पापड्या उन्हाळ्यात आपण करु शकतो (Sabudana Papdi Authentic Recipe Valvan).
साबुदाणा भिजवून तो शिजवून पापड्या करायच्या असतील तर कधी पाण्याचा अंदाज न आल्याने या पापड्या चुकण्याची शक्यता असते. मात्र खाली दिलेल्या प्रमाणाने पापड्या केल्यास त्या अतिशय उत्तम होतात. विशेष म्हणजे यासाठी शिजवण्याची किंवा साबुदाणा वाटून घेण्याची गरज नसते. साबुदाणा वाटला नसल्याने पूर्ण फुलतो आणि या पापड्या खायला अतिशय चविष्ट लागतात. मीठ, जीरं आणि मिरची याची छान चव लागल्याने या पापड्या खाताना फारच मस्त लागतात. हलक्या असल्याने तळल्यानंतर या पापड्या दुप्पट फुलतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. कमीत कमी पदार्थात आणि कष्टात होणाऱ्या या पापड्या कशी करायच्या पाहूया...
साहित्य -
१. पाणी - १२ वाट्या
२. साबुदाणा - २ वाटी
३. बटाटे - ३ ते ४ मध्यम आकाराचे
४. जीरे - २ चमचे
५. हिरवी मिरची -७ ते ८ (बारीक वाटलेल्या)
६. मीठ - चवीनुसार
कृती -
१. रात्री झोपताना एका मोठ्या पातेल्यात १२ वाटी पाणी घेऊन ते उकळेपर्यंत गरम करायचे.
२. चांगली उकळी आली की गॅस बंद करुन २ वाटी कच्चा साबुदाणा या पाण्यात घालायचा.
३. पातेल्यावर झाकण ठेवून रात्रभर हे तसेच ठेवायचे. सकाळपर्यंत हा साबुदाणा खूप फुलतो.
४. मग यामध्ये जीरे, मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची आणि मीठ घालायचे.
५. बटाट्याची साले काढून ते किसून या मिश्रणात घालायचे.
६. सगळे एकजीव करुन प्लास्टीकच्या पेपरवर याच्या पापड्या घालायच्या.
७. संध्याकाळी या पापड्या अर्धवट ओल्या असताना उलटून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुने ऊन द्यायचे.
८. तुम्हाला पूर्ण साबुदाणा नको असेल तर सकाळी उठल्यावर तुम्ही रात्रभर भिजलेला साबुदाणा मिक्सरवर बारीक करुन मग पापड्या घालू शकता.