आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या पंढरीच्या वारीला आपल्या महाराष्ट्रात विशेष मानले जाते. या दिवशी अनेकाजण उपवास असतात. परंतु उपवास म्हटलं की आपल्याकडे साबुदाणा हा ठरलेलाच असतो. साबुदाण्याची खिचडी, वडा, बटाटा वेफर्स, बटाट्याची भाजी हे पचायला जड आणि अॅसिडिटी वाढवणारे पदार्थ आहेत. अशावेळी उपवासाला नेमके काय खावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. उपवासाच्या दिवशी अॅसिडिटी होऊ नये म्हणून पचण्यास हलके आणि नेहमीपेक्षा हटके, टेस्टी पदार्थ बनवणे हाच उत्तम पर्याय आहे.
उपवास म्हटलं की आपल्याला मोजकेच पदार्थ आठवतात. उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी (Sabudana Khichadi), साबुदाण्याचे वडे (Sabudana Wade), भगर (Bhagar), रताळे (Sweet Potato) असे उपवासाचे पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. बहुतांश लोक बनवायला साधी सोपी असणारी साबुदाण्याची खिचडीच बनवतात. उपवास म्हटलं की घरातल्या सर्वांना चटपटीत, चमचमीत पदार्थ खायला आवडतात आणि त्यातल्या त्यात साबुदाण्याचे पदार्थ म्हणजे सगळ्यांचेच आवडते. आषाढीनिमित्त घराघरात (Sabudana Aloo Paratha) साबुदाण्याची खिचडी (Sabudana Khichadi) बनवण्याची तयारी सुरुच असेल. पण याच साबुदाण्याचा वापर करून रोजची तीच ती खिचडी बनवण्यापेक्षा उपवासाचे पराठे नक्कीच बनवू शकतो. यंदाच्या आषाढी एकादशीला उपवासाचे पराठे नक्की ट्राय करा, त्याची सोपी रेसिपी पाहूयात(Sabudana Paratha Recipe).
साहित्य :-
१. साबुदाणा - १ कप २. बटाटा - २ (उकडलेले)३. मीठ - चवीनुसार ४. जिरं - १ टेबलस्पून ५. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)७. पाणी - गरजेनुसार ८. तेल / तूप - २ ते ३ टेबलस्पून
फक्त ५ मिनिटांत करा कांद्याची चटणी, पावसाळ्यात कच्चा कांदा नको- खा अशी मस्त चमचमीत चटणी...
कृती :-
१. एका पॅनमध्ये साबुदाणा घेऊन तो ५ ते १० मिनिटे हलकेच कोरडा भाजून घ्यावा. २. आता हा भाजून घेतलेला साबुदाणा एका डिशमध्ये काढून गार करुन घ्यावा. गार झाल्यावर हा साबुदाणा मिक्सरमध्ये एकदम बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावा. ३. त्यानंतर बारीक गाळणी मधून ही साबुदाण्याची पूड चाळून घ्यावी. ४. साबुदाण्याची ही पूड घेऊन त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन घालावेत. त्यानंतर यात चवीनुसार मीठ, जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालावी. ५. आता गरजेनुसार यात पाणी घालून कणीक मळतो तसे पीठ मळून घ्यावे.
६. मळून घेतलेले पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. ७. या पिठाचे लहान लहान गोळे करुन घ्यावेत. आता या गोळ्यांचा पराठा लाटून घ्यावा. पराठा लाटताना आधी पिठाचा गोळा साबुदाण्याच्या बारीक केलेल्या पिठात घोळवून घ्यावा म्हणजे तो लाटताना चिकटत नाही. ८. आता हा उपवासाचा पराठा गरम तव्यावर तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यावा.
उपवासाचा पराठा खाण्यासाठी तयार आहे, हा पराठा आपण दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.