खारे शेंगदाणे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण! चार दाणे तोंडात टाकले तरी चवपालट होते, पाणी प्यायला आधार मिळतो आणि छोटी भूक सहज भागते. पण म्हणतात ना, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो! तसेच खारे शेंगदाणे आवडत असले तरी खाऱ्या शेंगदाण्याचा बकाणा भरणे योग्य नाही. मिठाचे अतिसेवन म्हणजे रक्तदाबाला आमंत्रण! ते टाळण्यासाठी खारे शेंगदाणे प्रमाणात खा आणि मजा घ्या!
खारे शेंगदाणे म्हटल्यावर भरूचला मिळणारे शेंगदाणे डोळ्यासमोर येतात, जे आपल्याकडे छोट्या, मोठ्या पुडीतही मिळतात. पण ते घरी बनवायचे असतील तर कष्ट फार नाहीत फक्त पुरेसा वेळ मात्र द्यावा लागतो. जाणून घेऊया रेसेपी!
साहित्य :
अर्धा किलो दाणे,
मीठ : एक किलो
पाणी : २ लिटर
कृती :
-सर्व प्रथम दोन लिटर पाणी गरम करायला ठेवावे.
-त्यात एक चमचा मीठ घालावे.
-पाणी गरम झाले की त्यात अर्धा किलो लांबट-मोठे शेंगदाणे घालावेत.
-पाच ते सात मिनिटं पाण्याला उकळी येऊ द्यावी.
-त्यानंतर वाफवलेले शेंगदाणे एका चाळणीत काढून घ्यावे आणि पाणी वेगळे करावे.
-वाफवलेल्या शेंगदाण्यांवर एक चमचा मीठ टाकून ते मिसळून घ्यावे.
-१५ मिनिटं मीठ ओल्या शेंगदाण्यात मुरू द्यावे.
-त्यानंतर एक जाड बुडाची कढई घ्यावी.
-बेकिंगसाठी वापरात असलेले पाऊण किलो मीठ कढईत घालावे.
-सगळेच शेंगदाणे त्यात एकत्र न टाकता टप्प्या टप्प्याने टाकावेत.
-शेंगदाणे मिठात परतत राहावे.
-सुरुवातीला ओल्या शेंगदाण्याला मीठ चिकटेल.
-पाच ते सात मिनिटांनी मीठ निघेल आणि शेंगदाणे कोरडे होताना दिसतील.
-माध्यम आचेवर शेंगदाणे परतत राहावेत.
-साधारण पंधरा मिनिटांनंतर शेंगदाण्याची सालं वेगळी होऊ लागतील. साल काढून पाहिले असता दाणा सोनेरी दिसेल.
-त्या स्टेजला शेंगदाणे झाऱ्याच्या मदतीने चाळणीत काढावेत, ताटात लगेच ठेऊ नये.
-शेंगदाणे थंड झाले की हवाबंद डब्यात ते काढून ठेवावेत. दीर्घकाळ टिकतात.