अभिनेत्री समीरा रेड्डी तिच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या सोशल मीडियवरील पोस्टमुळे खूपच चर्चेत असते. मग तिची पोस्ट ही बाळंतपणानंतर जाणवणाऱ्या डिप्रेशनची असू देत किंवा मुलीसोबत लहानतला लहान क्षण साजरा करण्याची असू देत.. तिच्या प्रत्येक पोस्टमधून ती स्वत:चा अनुभव शेअर करताना इतरांना उपयोगी पडेल असं काही ना काही सांगतच असते. सध्या समीरा रेड्डीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खूपच चर्चेत आहे.
समीराने पोस्ट केलेल्या या इन्स्टा व्हिडीओची दोन वैशिष्ट्यं आहेत ते म्हणजे या व्हिडिओतून सासू सुनेमधे दिसणारं गंमती जंमतीचं 'हेल्दी' नातं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे समीराच्या सासूने म्हणजेच मंजिरी वर्दे यांनी शिकवलेला खास गोवन स्टाइलचा 'सासू मसाला'. मसाल्याचं हे नावं जितकं गंमतीशीर आहे तितकाच हा व्हिडिओदेखील. या व्हिडिओच्या सुरुवातीला समीरा आपल्या व्हिडिओची मेन ॲक्ट्रेस असलेल्या सासूची स्पाॅटबाॅय म्हणून दिसते.
Image: Google
कधीकाळी मला स्वत:ला दोन दोन स्पाॅट बाॅय मदतीला लागायचे आता मला माझ्या सासूसाठी स्पाॅट बाॅयचं काम करावं लागतंय असं हसत हसत सांगून समीरा या व्हिडिओची सुरुवात करते. मग तिची सासू व्हिडिओची हिरोइन मी नाही तर 'मसाला' आहे असं सांगते. मंजिरी वर्दे यांनी या मसाल्याला सासू मसाला असं खास नाव दिलं आहे. त्याचं कारण म्हणजे सासूने सासूला शिकवलेला आणि सासूने सुनेला शिकवलेला मसाला. पण समीरा मी हा मसाला शिकणार नाही. हा मसाला सुनेचे खाण्याचे लाड पुरवणाऱ्या सर्व प्रेमळ सासूने शिकावा असा प्रेमळ आग्रह करते. मंजिरी वर्दे यांनी अतिशय उत्साहानं आणि सोप्या पध्दतीने हा 'सासू मसाला' शिकवला आहे.
Image: Google
कसा करायचा सासू मसाला?
मंजिरी वर्दे म्हणतात हा सासू मसाला एक आठवडा पुरेल इतका करुन ठेवला की आठवड्याभर चवदार भाज्या आणि आमट्या करता येतील. शिवाय हा सासू मसाला टू इन वन आहे. शाकाहारी भाज्या-आमट्यांसोबत हा मसाला मांसाहारी पदार्थांसाठी सुध्दा वापरता येतो.
या मसाल्यासाठी मंजिरी यांनी पाच ते सहा मोठे कांदे, दोन ते तीन लसणाच्या गड्डी, एक ते दोन मूठ कोथिंबीर, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, दोन ते तीन इंच आल्याचे बारीक तुकडे, 4-5 तमालपत्रं, 2 इंच दालचिनी तुकडे, 5-6 लवंगा, थोडे मिरे, दोन मोठे चमचे धने , 4-5 जायपत्री, 2 ते 3 छोटे चमचे जिरे, 3-4 सुक्या लाल मिरच्या, 2 खोबऱ्याच्य वाट्या किसलेल्या आणि दोन ते तीन चमचे थोडं तेल घेतलं.
Image: Google
आधी मंजिरी यांनी कांदे जाडसर उभे चिरुन घेतले, लसूण निवडून त्याचे बारीक तुकडे करुन घेतले, आलंही बारीक चिरुन घेतलं. कोथिंबीर निवडून धूवून थोडी सुकवून चिरुन घेतली. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करुन घेतले. सर्व सुका मसाला एका डिशमधे काढून घेतला. खोबरं किसून बाजूला ठेवलं.
सर्वात आधी कढईत किंचत तेल घेऊन त्यावर कांदा भाजायला घेतला. मंद आचेवर अजिबात घाई न करता तो लालसर भाजून घेतला. कांदा भाजल्यावर तो एका ताटात काढून घ्यावा. कढईत पुन्हा थोडं तेल घ्यावं. त्यात बारीक कापलेला लसूण, आलं, मिरच्या, कोथिंबीर हे चांगलं कुरकुरीत होईल असं भाजून घ्यावं. हे भाजून झालं की ते एका ताटात काढून ठेवावं. मग कढईत पुन्हा थोडं तेल घ्यावं. तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्रं, दालचिनी, जायपत्री, वेलची, लवंग, मिरे, जिरे, तीळ टाकून हे सर्व मसाले छान सुंगध सुटेपर्यंत भाजावेत. भाजलेला खडा मसाला बाजूला काढून ठेवावा. मग कढईत तेल न घालता खोबरं मंद आचेवर लालसर भाजून घ्यावं. भाजलेलं सर्व जिन्नस गार होवू द्यावं. मग सर्वात आधी खडा मसाला आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालावं. त्यात थोडं पाणी घालून मसाला बारीक वाटावा. हा वाटलेला मसाला बाजूला काढून ठेवावा. मग मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा आणि आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर घालावी. त्यात थोडं पाणी घालून हे सगळं बारीक वाटावं. कांद्याच्या मसाल्याची ही पेस्ट आधी वाटलेल्या खडा मसाला आणि खोबऱ्याच्या मसाल्यात घालून एकत्र करावी. ही पेस्ट एका हवाबंद डब्यात घालून फ्रीजमधे ठेवून द्यावी.
Image: Google
हा सासू मसाला घालून मंजिरी वर्दे यांनी मसूरची आमटी करुन दाखवली. यासाठी वाटीभर मसूर आठ तास पाण्यात भिजवून घेतले. मग कुकरमधे थोडं पाणी घालून शिजवून् घेतले. शिजलेल्या मसूराला फोडणी देण्यासाठी कढईत तेल घातलं. ते गरम केलं. त्यात थोडा हिंग, हळद घालून ते परतून् घेतलं. थोडा बारीक चिरलेला कांदा घातला. तो परतल्यावर शिजलेले मसूर घातलेले. गरम पाणी घातलं. ते चांगल्ं मिसळून् झाल्यावर त्यात तीन ते चार चमचे सासू मसाला घातला. मीठ घातलं आणि मसुराची आमटी चांगली उकळून घेतली.
हे सर्व मंजिरी वर्दे यांनी म्हणजेच समीरा रेड्डी यांच्या प्रेमळ आणि दिलखुलास सासूने अगदी हसत खेळत, आपण घातलेल्या साडीची प्रिंट किती सुरेख आहे हे दाखवत शिकवलं. त्यामुळे हा सासू मसाला विसरणं केवळ अशक्य!