एखादा पदार्थ जर दही घालून करायचा असेल तर तो चविष्ट लागतोच. पण खास दह्यातले पदार्थ कधी करुन खाल्ले आहेत का? महाराष्ट्रात कमी पण उत्तर भारत आणि पंजाब हरियाणा येथे खास दह्यातले पदार्थ नाश्ता आणि जेवणासाठी केले जातात. हे पदार्थ केवळ हाॅटेल/ ढाब्यावरच मिळतात असं नाही तर घरोघरी केले जातात. पाहुण्यांसाठी दही भेंडी, मुलांना आवडेल असा नाश्ता म्हणून दह्याचे सॅण्डविच तर दह्याचे कबाब संध्याकाळच्या स्नॅक्स पार्टीसाठी म्हणून केले जातात. दह्याचे हे 3 पदार्थ करायला अगदी सोपे आणि चवीला एकदम बेस्ट लागतात.
Image: Google
दही भेंडी
दही भेंडी करण्यासाठी पाव किलो भेंडी, पाव कप दही, 2-3 मोठे चमचे तेल, बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा बडिशेप पावडर, 1 बारीक कापलेली मिरची आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
Image: Google
आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. ती कोरड्या स्वच्छ कपड्यानं ;पुसून घ्यावी. भेंडी उभी चिरावी. कढईत तेल टाकून ते तापवून घ्यावं. तेलात आधी हिंग घालावा. जिरे घालून ते परतून घ्यावेत. हळद, तिखट आणि दही घालून ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. हा मसाला थोडा परतला गेला की त्यात भेंडी, मीठ, लाल तिखट आणि बडिशेप पावडर घालावी. सर्व नीट मिसळून घ्यावं. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी 3-4 मिनिटं शिजवावी. मधून मधून भाजी हलवावी. पुन्हा कढईवर झाकण ठेवून भाजी 3-4 मिनिटं शिजवावी. 10 मिनिटात भाजी व्यवस्थित शिजते. गॅस बंद करुन भाजी नीट हलवून घ्यावी. त्यावर चिरलेली कोथिंबीर पेरावी. फुलके, पराठे किंवा पुरी यासोबत ही भाजी टेस्टी लागते.
Image: Google
दही कबाब
दही कबाब करण्यासाठी 2 मोठे चमचे मिरेपूड , 2 मोठे चमचे धने, 1 कप बेसन पीठ, 1 कप जाड कापलेला कांदा, 1 लहान चमचा बारीक कापलेलं आलं, 3 हिरव्या मिरच्या, 7-8 बेदाणे, 7-8 काजू, 2 मोठे चमचे चिली फ्लेक्स, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप किसलेलं पनीर आणि अर्धा कप काॅर्न फ्लोर घ्यावं.
Image: Google
दही कबाब करताना आधी मिरे आणि धने कोरडे भाजावेत. ते गार झाले की बारीक वाटून घ्यावेत. एका कढईत बेसन पीठ भाजून घ्यावं. नंतर एका मोठ्या भांड्यात कांदा, हिरवी मिरची, आल्याचे तुकडे, बेदाणे, मिरे-धन्याची पूड, पनीर आणि मीठ घालावं. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. कबाब करण्यासाठी दह्यातलं पानी काढून घ्यावं. एका भांड्यात दही घ्यावं. त्यात मीठ, मिरे धन्याची पूड, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, कोथिंबीर, पनीर, बेसन पीठ आणि काॅर्न फ्लोर घालावं. हे सर्व नीट एकत्र करावं. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. एक गोळा हातावर घेऊन तो हाताने दाबून थोडा चपटा करावा. त्यात कांदा पनीर घालून तयार केलेलं सारण घालून गोळ्याला कबाबचा आकार द्यावा. हे कबाब नाॅन स्टिक तव्यावर तेल टाकून सोनेरी रंगावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत. कोथिंबीर आणि पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत दही कबाब छान लागतात. सोबत G2 या कंपनीचे सॉल्टेड चिप्स, टाेमॅटो चिप्स असतील तोंडी लावायला तर चवीची ही लज्जत अजूनच वाढते.
Image: Google
दही सॅण्डविच
दही सॅण्डविच करण्यासाठी 8 ब्रेड , 1 कप पाणी काढून घेतलेलं चक्का स्वरुपातलं दही, 1 कप किसलेलं गाजर, 1 सिमला मिरची, 1 टमाटा, 1 कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, पाव चमचा मिरे पूड, मीठ, चाट मसाला आणि 2 मोठे चमचे साजूक तूप घ्यावं.
Image: Google
दही सॅण्डविच करताना एका सुती कापडात दही घालून ते बांधून रात्रभर टांगून ठेवावं. यामुळे दह्यातलं पाणी निघऊन जातं. दह्याचं सॅण्डविच करताना भाज्या तेव्हाच चिराव्यात . आधी चिरुन ठेवू नये. पाणी सुटतं. गाजर, सिमला मिरची आणि कांदा हे सर्व एकत्र दह्यात एकत्र करावं. त्यात मीठ, मिरे पूड आणि चाट मसाला घालावा. मिश्रण नीट मिसळून घेतल्यानंतर ते ब्रेडला लावावं. मिश्रण लावलेल्या ब्रेडवर एक ब्रेड ठेवून तो हातानं हलका दाबावा. तवा गरम करुन त्यावर चांगलं तूप घालावं. तूप तापलं की थोडी मोहरी घालावी. तुपाच्या या फोडणीवर ब्रेड दोन्ही बाजूंनी चांगले भाजावेत. ब्रेड भाजताना गॅसची आच मंद ठेवावी. ब्रेड कुरकरीत भाजले गेले की तव्यावरुन काढून घ्यावेत. दह्याचे सॅण्डविच तसेच छान लागतात. सॅण्डविचसोबत तर वेफर्स,चिप्स, क्रंची मुगडाळही हवीच. G2 या कंपनीचे सॉल्टेड चिप्स, टाेमॅटो चिप्स, मूग डाळ असतील तोंडी लावायला तर चवीची ही लज्जत अजूनच वाढते.