ऋचा मोडक
उपवासाचे अवियल किंवा उपवास सूप आणि सोबत उपवास शेवया, उपवासाचे नूडल्स असा पदार्थ केला तर उपवास किती सुंदर होईल ना? कल्पना जितकी मस्त, तितकेच हे पदार्थ चवीला उत्तम, उपवासाला न बाधणारे, पोषक आणि करायला सोपे आहे. आणि साहित्यही कायम आपल्या घरात असते तेच.फक्त थोडी कल्पकता आणि खाण्यावर प्रेम. आज संकष्टी चतुर्थी, त्यातही अंगारक योग. करुन पहा हे खास पदार्थ. ( sankashti chaturthi)
उपवासाचे अवियल कसे करायचे?
लाल भोपळा, बटाटा, सुरण सोलून तुकडे करून उकडून घ्यावे, उकडलेली अरबी सोलून तुकडे, भेंडीचे मोठे तुकडे,कच्ची केळी सोलून काप करून, तूप जिऱ्याची फोडणी त्यात मिरचीचे वाटण लावून या भाज्या परतून घ्याव्या. भेंडी, केळं मऊ झाले की त्यात दही घोटून आणि नारळाचे दूध घालून उकळी आणावी मीठ घालून एक हलकी उकळी काढावी. की झालं अवियल तयार. एकदम सोपं आणि चविष्ट.
(Image : Google)
उपवासाच्या नूडल्स कधी खाल्ल्या का?
नूडल्स उपवासाला खात नाही असं कोण म्हणतं? उपवासाच्या नूडल्सही करता येतात.वरी ( म्हणजेच भगर), राजगिरा लाही पीठ, साबुदाणा पीठ, शिंगाडा पीठ, कच्च्या केळ्याचे पीठ यापैकी तुमच्याकडे जे असेल ते पीठ घ्या.नेहमी वाटीभर पीठ, वाटीभर पाणी, मीठ घालून जशी उकड करतो. तशी उकड काढा. मग शेवया सोऱ्यानं त्याच्या शेवया तयार करून त्या परत वाफवून घ्या.या शेवया( नूडल्स) तळूनही घेता येतील. किंवा तशाच वाफवलेल्या शेवयाही खाता येतील.या नूडल्सचेही आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो. नूडल्स ,उपमा, अवियलसहही खाऊ शकता.
अवियल आणि नूडल्स
वाफवलेल्या शेवया घेऊन त्यावर उपवासाचे अवियल घालावे थोडे पातळ होण्यासाठी नारळाचे दूध जास्त घालावे त्यावर तळलेले शेंगदाणे, तळलेले/ किंवा तसेच पनीरचे तुकडे,कुरकुरीत भेंडी, असे वरून घालून लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून गरमागरम खायला तयार. फार उत्तम लागते.
(Image : Google)
कुरकुरीत भेंडी चाट
अवियल, नूडल्स आणि त्याला सोबत कुरकुरीत भेंडी चाट.कुरकुरीत भेंडीभेंडीचे उभे ४/६ काप करून मीठ लावून ठेवावे. उपासाला चालणारेवरील पैकी कुठलेही पीठ किंवा उपवास भाजणी कोरडे घेऊन त्यात मीठ लावलेली भेंडी घोळवून ती तेल/तुपात मंद आचेवर तळून कुरकुरीत करून घ्यावी.कुरकुरीत भेंडी चाट-वरून लिंबू लाल तिखट जिरे आवडत असेल आणि उपवासाला चालत असेल तर चाट मसाला हवे ते भुरभुरून नुसता खायला छान लागते.त्यावर दही आणि गोड खजूर चिंच चटणी घेऊन खाता येते. त्यावर दही आणि गोड खजूर चिंच चटणी घेऊन खाता येते.कर के देखो!
(लेखिका खाद्यप्रेमी, अभ्यासक आहेत.)