शिरा हा गोड पदार्थ सहसा बऱ्याच घरात नाश्ता, स्वीट डिश म्हणून किंवा देवाला नैवेद्य म्हणून आपण बनवतोच. या गोड पदार्थाची विशेषतः म्हणजे, शिरा बनवायला खूप सोपा आणि अगदी कमी वेळेत बनवता येतो. कौटुंबिक सोहळा किंवा एखाद्या पूजेसाठीही गोडाचा शिरा आवर्जून केला जातोच. गोडाचा शिरा करताना आपण तो पारंपरिक पद्धतीने करतोच परंतु या पौष्टिक शिऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फळ घालून त्याची चव आणखीनच वाढवू शकतो.
आपण शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स, फळांचे रस, फळांचे बारीक काप घालून वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर्ड शिरा बनवू शकतो. नैवेद्य व प्रसादासाठी नेहमी तोच पारंपरिक पद्धतीचा शिरा बनविण्याऐवजी आपण अननसाचा वापर करून अननसाचा शिरा तयार करू शकतो. हा शिरा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडेल यासोबतच काहीतरी नवीन वेगळी चव चाखल्याचा आनंदही मिळेल. यंदाच्या संकष्टी चतुर्थीला नैवेद्यासाठी अननसाचा शिरा नक्की करून पाहाच(Sankashti Chaturthi Special : Pineapple Shira Recipe).
साहित्य :-
१. अननसाचे लहान तुकडे - १/२ कप २. रवा - १/२ कप ३. तूप - १/४ कप (वितळवून न घेतलेले घट्टसर)३. साखर - ३/४ कप ४. वेलची पूड - १/४ टेबलस्पून ५. मीठ - चिमूटभर ६. गरम उकळते पाणी - १ + १/४ कप ७. काजू व बदामाचे काप - २ टेबलस्पून ८. केशर - ५ ते ६ काड्या (गरम दुधात भिजवून घेतलेले)९. खाण्याचा पिवळा रंग - २ थेंब (पर्यायी)१०. दूध - २ ते ३ टेबलस्पून
simplyyummyfood या इंस्टाग्राम पेजवरून अननसाचा शिरा कसा तयार करायचा याची स्पेशल रेसिपी शेअर करण्यात आली आहे.
कृती :-
१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अननसाचे लहान तुकडे घेऊन त्यात १ टेबलस्पून साखर घालावी. २. आता एका पॅनमध्ये तूप घालून त्यात काजू व बदामाचे काप खरपूस भाजून नंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत. ३. आता पॅनमधील तूपात रवा घालून तो गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावा. ४. रवा गोल्डन ब्राऊन रंगात भाजून झाल्यावर त्यात गरजेनुसार गरम उकळते पाणी घालून घ्यावे.
५. गरम पाणी घालत्यावर रवा थोडा फुगून झाल्यावर त्यात दुधात भिजविलेले केसर व २ टेबलस्पून दूध घालावे. ६. आता या मिश्रणात गरजेनुसार खाण्याच्या पिवळ्या रंगाचे २ थेंब घालावेत. (हे पर्यायी आहे). ७. आता या तयार झालेल्या शिऱ्यामध्ये साखर घालून त्यात भिजविलेले अननसाचे लहान तुकडे व साखर घालून ढवळून घ्यावेत. ८. चवीनुसार किंचित चिमूटभर मीठ घालावे. ९. चवीनुसार वेलची पूड आणि १ टेबलस्पून तूप तयार झालेल्या शिऱ्यामध्ये घालावे. १०. आता त्यावर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे तसेच शिजू द्यावे. ११. शिजवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यावर काजू व बदामाचे किसलेले काप घालून तयार झालेला अननसाचा शिरा सर्व्ह करावा.
अननसाचा टेस्टी गोड शिरा नैवेद्यासाठी तयार आहे.