Join us  

‘न खाई भोगी तो सदा रोगी’! - कोकणातल्या पारंपरिक पद्धतीची संक्रांतस्पेशल ‘लेकुरवाळी भाजी, विसरलात तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 4:57 PM

उंधियोचं ग्लॅमर या लेकुरवाळ्या भोगीच्या भाजीला नाही, मात्र वाफेवर शिजवलेली पौष्टिक भोगीची भाजी खाण्यात मजा आहे.

ठळक मुद्देही साधी रुचकर पौष्टिक भाजी या दिवसात नक्की खावीच.फोटो सौजन्य : अर्चनाज‌ किचन

- स्मिता दामले

न खाई भोगी तो सदा रोगी..लहानपणी भोगीची भाजी म्हंटलं की आम्ही बहिणी नाक तोंड वेंगडायचो तेव्हा आई हमखास हे ऐकवायची. कोकणात या भाजीला ‘लेकुरवाळी भाजी’ म्हणतात.किती छान ना ! हिवाळ्यात आपल्या परसातल्या विविध हिरव्यागार पौष्टिक आणि उष्ण गुणधर्म असलेल्या भाज्या आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी असा थंडीचा उष्ण मेनू एकदम हाय क्लास. आता आपण हाॅटेलात मिक्स व्हेज आवडीने खातो, हिवाळ्यात तर उंधियोची किती चर्चा होते. मात्र उंधियोचं ग्लॅमर आपल्या या भोगीच्याा भाजीला नाही. पारंपरिक, पौष्टिक, कोकणातल्या पध्दतीची ही भाजी यंदा जरुर करुन पहा.

(Image : Google)

साहित्य-कृती

वालाच्या कोवळ्या शेंगा, हिरवे दाणे, कोवळे हरभरे, वांगी, शेवग्याच्या शेंगा, कच्ची केळी, थोडं सुरण हा सगळा परसातला ठेवा.हल्ली त्यात गाजर, मटार, थोडी मेथी बटाटा यांची पण भर पडली आहे.कच्ची केळी उकडवून घ्यायची आणि बाकी भाज्या चिरून भरपूर तेलात तीळ वगैरे घालून फोडणी करायची.  त्यात वाफवून घ्यायच्या.पातेल्यावर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवायचं म्हणजे भाज्या करपत नाहीत. भाजीवर ही थोडं पाणी शिंपायचं. ही भाजी नेहमी वाफेवरच शिजवून करावी चव आणि पौष्टिक गुणधर्म हे दोन्ही दसपट वाढतातवाफेवर सर्व भाज्या शिजत आल्या की केळी टाकून परत एक वाफ काढायची. नंतर त्यात भरपूर ओला नारळ तिखट मीठ गोडा मसाला घालून थोडंसं पाणी घालून भाजी सारखी करून घ्यायची. थोडं तीळकूट आणि दाण्याचं कुट पण आवडीप्रमाणे घालू शकता.वरून कोथिंबीर पेरायची.वाटणघाटन नाही. जास्त मसाल्यांचा मारा नाही.तरी लहानपणी नाक मुरडलेली ही भाजी आता ओरपुन खाल्ली जाते.तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यात नारळाच्या दुधातलं बरंच वाटण वगैरे लावतात.पण ही साधी रुचकर पौष्टिक भाजी या दिवसात नक्की खावीच.तसंही आपल्या सगळ्या सणांमध्ये ऋतूप्रमाणेच आहार आणि पक्वान्न ह्यांची सांगड घातलेली आहेच.तेच आपण फॉलो केलं तर खरं..

टॅग्स :अन्नमकर संक्रांती