हलके फुलके कुरमुरे खायला कोणाला आवडत नाहीत. कुरमुरे हा खूप जणांच्या आवडीचा असा स्नॅक आहे. कुरमुऱ्यांपासून भेळ, भडंग, चिवडा असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. कुरमुऱ्यांचा आहारात समावेश हा फारच फायद्याचा असतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा मकरसंक्रांत हा सण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांत साजरी करण्यासाठी घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न तयार केले जातात. याच यादीतील एक गोड पदार्थ म्हणजे कुरमुऱ्याचे लाडू. ही रेसिपी अतिशय कमी वेळात झटपट तयार होते. कुरमुऱ्याचे लाडू आणि कुरमुऱ्याची चिक्की कशी बनवता येईल याची सोपी कृती समजून घेऊयात(KURMURA LADDOO RECIPE).
Ranveer Brar या सुप्रसिद्ध शेफनी आपल्या इंस्टाग्राम ranveer.brar पेजवरून कुरमुऱ्याचे लाडू आणि कुरमुऱ्याची चिक्की कशी बनवता येईल याची पाककृती शेअर केली आहे.
साहित्य -
१. कुरमुरे - २ कप २. तूप - १ टेबलस्पून ३. बदाम - ५ ते ६ (बारीक काप केलेले)४. काजू - ५ ते ६ (बारीक काप केलेले)५. गूळ - ३/४ कप (बारीक किसून घेतलेला)६. बडीशेप - १ टेबलस्पून ७. काळीमिरी पावडर - १ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. सुक खोबर - १/४ कप (बारीक किसून घेतलेल)१०. सुक्या गुलाबाच्या पाकळ्या - आवडीनुसार
कृती -
१. एका कढईमध्ये कुरमुरे घेऊन ते कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्या. २. मोठ्या पातेल्यात मंद आचेवर तूप घालून मग त्यात गुळ संपूर्णपणे वितळवून घ्यावा. ३. गूळ संपूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत त्याला मंद आचेवर चमच्याने ढवळत राहा. ४. त्यानंतर त्यात बडीशेप व काळीमिरी पावडर घालून एकजीव करून घ्या. ५. या मिश्रणात मीठ, सुक खोबर आणि ड्रायफ्रुटस मिक्स करून घ्यावेत. ६. आता गॅस बंद करून या तयार झालेल्या गुळाच्या पाकात भाजून घेतलेले कुरमुरे घाला. गुळाचा पाक आणि कुरमुरे ढवळून एकत्रित करून घ्या. ७. हाताला तूप किंवा पाणी लावून हे लाडूचे मिश्रण गरम असेपर्यंत गोल आकाराचे लाडू वळून घ्या.
कुरमुऱ्याची चिक्की करण्यासाठी -
१. वरील मिश्रणापासून तुम्ही कुरमुऱ्याची चिक्की देखील बनवू शकता. २. वरील तयार झालेल्या मिश्रणाचे लाडू वळण्याऐवजी एका ट्रेमध्ये किंवा कडा असलेल्या मोठ्या ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण ओतावे. ३. हाताच्या मदतीने हे मिश्रण ताटात थापून घ्यावे.४. ताटात थापून सपाट केलेल्या मिश्रणांवर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून गार्निशिंग करून घ्यावे. ५. ताटातील मिश्रण किंचित थंड झाल्यावर सुरीला तूप लावून चौकोनी आकारातील तुकडे कापून चिक्की करून घ्यावी.
कुरमुऱ्याचे लाडू आणि कुरमुऱ्याची चिक्की खाण्यासाठी तयार आहेत.